माहीम पोलीस वसाहतीत बुधवारी रात्री दुर्मीळ जातीचा उडणारा साप आढळला. सरपटत जाण्याऐवजी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारणे हे त्याचे वैशिष्टय़ असल्याने त्याला उडणारा साप हे नाव पडले आहे. सर्पमित्र असलेल्या पोलीस हवालदाराने या सापाला पकडून वन विभागाकडे सुपूर्द केले.
 माहीम पोलीस वसाहतीत राहणारे पोलीस अधिकारी विनोद माळवे यांच्या घरात बुधवारी रात्री खिडकीतून हा उडता साप आला. त्याला काठीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करताच हा साप एका भिंतीवरून दुसऱ्या भिंतीवर उडी मारून लागला. त्यामुळे घाबरून त्यांनी त्वरित सर्पमित्र असलेले पोलीस ठाण्याचे हवालदार मुरलीधर जाधव यांना बोलावले. हा उडता साप असल्याचे लक्षात येताच त्यांनी कौशल्याने या सापाला पकडले.
तो साप उडत नाही
सापाचे इंग्रजी नाव ब्रॉंझ बॅक ट्री स्नेक असे आहे. तो बिनविषारी आहे. त्याचे आयुष्य अवघ्या दीड वर्षांचे आहे. तो प्रामुख्याने खानदेशात आढळतो. मुंबईत तो प्रथमच आढळून आला आहे. दुर्मीळ जातीच्या सापाच्या प्रजातीत हा साप मोडतो. वास्तविक तो उडत नाही. तो एका झाडावरून दुसऱ्या ठिकाणी उडी मारतो. त्यामुळे तो बघणाऱ्यांना उडाल्यासारखा दिसतो. म्हणून या सापाला बोलीभाषेत उडणारा साप हे नाव पडले आहे. तो प्रामुख्याने झाडावरच राहतो. झाडावरचे कीटक, पक्ष्यांच्यी अंडी हे त्याचे खाद्य आहे. या सापाला वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले असून, नंतर तेथून तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडला जाणार आहे.
–   मुरलीधर जाधव, सर्पमित्र