‘महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीच्या दस्तावेजीकरणाची गरज’

‘महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती ही विविध चवींनी समृद्ध आहे. मात्र या संस्कृतीची व्यापकता जगाला फारशी माहीत नाही. तिचा प्रसार होण्यासाठी सध्याच्या मौखिक खाद्यपरंपरेचे लिखित स्वरूपात दस्तावेजीकरण करावे व पुढे जाऊन त्याचे दृक्श्राव्य माध्यमातूनही जतन व्हावे’, अशी अपेक्षा मंगळवारी ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म २०१७’ वार्षिकांकाच्या प्रकाशनप्रसंगी व्यक्त करण्यात आली. ‘चवीने खाऊ या.. निगुतीने त्यावर लिहू या..’ या मंत्राच्या जपणुकीची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.

What Sanjay Raut Said?
“देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी, त्यामुळेच..”; संजय राऊत संतापले
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
rain in Vidarbha
सावधान! येत्या ४८ तासांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता
Uddhav Thackeray Speech
Uddhav Thackeray : “गद्दारांच्या देशा, गुंडांच्या देशा, लाचारांच्या देशा ही आता महाराष्ट्राची ओळख होत चालली आहे”

पितांबरी रुचियाना गूळ प्रस्तुत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ वार्षिकांकाचे प्रकाशन मंगळवारी दादर येथील रवींद्र नाटय़ मंदिरात खाद्यप्रेमींच्या भरगच्च उपस्थितीत, खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक मोहसिना मुकादम व प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते झाले. या वेळी व्यासपीठावर व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स प्रा.लि.चे अजित बेडेकर, कल्पना तळपदे, शुभा प्रभू-साटम, खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासिका मोहसिना मुकादम, शेफ विष्णू मनोहर, केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील, दीपा पाटील, ज्योती चौधरी मलिक, पितांबरीचे दिलीप वेलणकर, गद्रे प्रीमिअम सी फूड्सचे संकल्प थळी आणि ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर उपस्थित होते. ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा हा चौथा वार्षिकांक आहे.

पितांबरी रुचियाना गूळ प्रस्तुत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चे सहप्रायोजक व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स आहेत. बँकिंग पार्टनर डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड, पॉवर्ड बाय केसरी टूर्स, गुणाजी एंटरप्रायझेस आणि गद्रे प्रीमियम सीफूड्स आहेत.

‘महाराष्ट्रातील विविध ज्ञातींच्या घरांपासून सुरू झालेली खाद्यसंस्कृती विसाव्या शतकात जातीची बंधने तोडून बाहेर पडली. एकमेकांच्या स्वयंपाकघरात डोकावल्यानंतर खाद्यपदार्थामधील विविधता लक्षात येते. ही विविधता म्हणजेच महाराष्ट्राची व्यापक खाद्यसंस्कृती होय’, अशा शब्दांत मोहसिना मुकादम यांनी खाद्यसंस्कृतीचे विवेचन केले. ‘मात्र ही खाद्यसंस्कृती जगभरातील खवय्यांना माहिती व्हावी, यासाठी तिचे दस्तावेजीकरण गरजेचे आहे’, असे त्या म्हणाल्या. ‘जगाच्या ताटात महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ रुजवण्यासाठी खाद्यसंस्कृती वैचारिक दृष्टिकोनातूनही व्यापक होण्याची गरज आहे’, असे त्या म्हणाल्या. ‘आज परप्रातांतून आलेले बरेच पदार्थ आपण आपलेसे केले आहे. जे पदार्थ आपल्याला आवडतात ते दुसऱ्या व्यक्तीला आवडलेच पाहिजेत, असे बंधन नाही. पण न आवडणारे पदार्थ स्वीकारून त्याचा अभ्यास करावा’, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

शेफ विष्णू मनोहर यांनी, ‘ठिकठिकाणी पाणीपुरी, पाव-भाजी हे खाद्यपदार्थ विकले जातात. मात्र कुठेही मराठी माणूस पिठलं-भाजी-भाकरी विकताना दिसत नाही’, अशी खंत व्यक्त केली. ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकात खाद्यपदार्थाची माहिती देणाऱ्या चौघींनी विष्णू मनोहर यांच्याशी संवाद साधला.

‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकाचे प्रयोजन नमूद करताना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर म्हणाले, ‘इतिहास जपण्यासाठी त्याचे दस्तावेजीकरण आवश्यक असते. महाराष्ट्राच्या व्यापक खाद्यसंस्कृतीचे तपशीलवार दस्तावेजीकरण व्हावे व पुढच्या पिढीला याची माहिती व्हावी यासाठी ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ हा खास अंक खाद्यप्रेमींसाठी आणला आहे’,  ‘पेशव्यांच्या काळात साडेतीन हात केळीच्या पानावर अन्न वाढले जायचे, या पानावर कुठले पदार्थ होते, ते कसे आले असतील याचा शोध घेण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे’, असा मुद्दा त्यांनी मांडला.