पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाची सूचना

रेल्वे स्थानकात फलाटावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा प्रश्न सोडविण्याकरिता खाद्यपदार्थाच्या ठेल्यांचा आकार कमी करण्यात यावा, अशी सूचना पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाने केली आहे. त्यावर पश्चिम रेल्वेकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

२९ सप्टेंबर रोजी पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ प्रवाशांना जीव गमवावा लागला. त्यानंतर स्थानकात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण कसे मिळविता येईल, यावर उपाय शोधण्यास सुरुवात झाली. रेल्वेकडून नेमलेल्या समितीकडूनही पादचारी पुलांची रुंदी वाढविण्याची तसेच स्थानकाला जोडून असणारी अतिक्रमणे हटविण्याची सूचना करण्यात आली आहे.

प्रवाशांना फलाटावर सहज वावर करता यावा यासाठी पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार आणि डहाणू स्थानकांमधील खाद्यपदार्थाचे ठेले आकाराने कमी करण्याचे सुरक्षा दलाने स्पष्ट केले आहे. दादर, वांद्रे, खार, सांताक्रुझ, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, आणि बोरिवली या गर्दीच्या स्थानकांच्या फलाटावर ठेल्यांची संख्या अधिक आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नोकरदारांना रेल्वेच्या ठेल्यांवरील खाद्यपदार्थाचा मोठा आधार असतो. असे असले तरी फलाटावर दिवसभर प्रवाशांची गर्दी असते. मात्र लोकल आल्यानंतर फलाटावरील गर्दी वाढते, असे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी निरीक्षण नोंदवले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी गर्दीच्या स्थानकातील ठेल्याची माहिती गोळा करून एक अहवाल तयार केला. यात ठेल्यांचा आकार बराच मोठा असल्याचे त्यात म्हटले आहे. ठेल्यांमुळे फलाटांवरील बरीच जागा व्यापली जाते. त्यामुळे प्रवाशांना चालण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते. यातील काही ठेले पादचारी पुलांच्या नजीक आहेत. त्यामुळेही प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, काही ठेल्यांचा आकार परवानगी न घेता वाढविल्याचे निरीक्षणात आढळले आहे.