शीना बोरा हत्या प्रकरणात पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, रविवारी आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्ह्य़ाचा घटनाक्रम उलगडला. शनिवारी रात्रीही आरोपींची कसून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले
पेणमधील गागोदे खुर्द गावात रविवारी सकाळी आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले. वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयासमोरून २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाचे अपहरण करण्यात आले. यासाठी किती वेळ लागला ते अंतरही नोंदविण्यात आले. आरोपींना घटनास्थळावर नेऊन त्यांच्याकडून ज्या ठिकाणी मृतदेह फेकला होता त्या जागेची माहिती घेण्यात आली. कुठल्या मार्गाने प्रवास केला, कुठे थांबले, त्याचेही तपशील नोंदविण्यात आले. शीनाची हत्या करण्याचे नक्की झाल्यानंतर तिला नेमके कसे मारायचे, याचा विचार सुरू झाला. तिला मारून ती अमेरिकेत गेली, असे भासवायचे होते. तिचा खून करून मृतहेह पंख्याला लटकवायचा आणि तिचा प्रियकर राहुलला त्यात अडकवायचा अशी एक योजना होती. तर सुपारी देऊन तिची हत्या करण्याबाबतही विचार सुरू होता, परंतु त्या काळात चित्रपट निर्माते करण कक्कर याचे हत्या प्रकरण गाजले होते. विजय पालांडे याने कक्करचे अपहरण करून त्याची हत्या केली. त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते सातारा-गोवा महामार्गावरील कुंभार्ली घाटात टाकून दिले होते. इंद्राणीला हा पर्याय जास्त सोपा वाटला. या घटनेचा तिने अभ्यास केला आणि त्याप्रमाणे ही अंतिम योजना बनवली. गाडीत हत्या केली तर मृतदेह हाती लागणार नाही व ती बेपत्ता असण्याची तक्रार करणार नसल्याने तिला कुणी शोधणारही नाही, असा तिचा कयास होता.
दरम्यान या प्रकरणी तिन्ही आरोपींना सोमवारी वांद्रे न्यायालयात हजर केले जाणार असून आणखी १४ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून घेतली जाणार आहे.