मुंबईतील पाणथळीच्या कमी होणाऱ्या जागा इतर कुणाच्या नसल्या तरी मुंबई विद्यापीठाच्या नक्कीच पथ्यावर पडत आहेत. कारण, त्यानिमित्ताने इथल्या पाणथळींवर भक्ष्याच्या शोधात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचा वावर वाढला आहे. ब्लॅक विंग स्टिल्ट्स, ग्लॉस-आयबिस, रोझी पॅस्टर यांच्याबरोबरच तब्बल आठ प्रकारच्या परदेशी बदकांच्या जाती येथे पक्षीप्रेमींना सध्या पाहायला मिळत आहेत. साता समुद्रापलीकडून येणाऱ्या या रंगीबेरंगी पक्ष्यांचे हे जागतिक संमेलन म्हणूनच इथे येणाऱ्या पक्षीप्रेमी विद्यार्थी व प्राध्यापकांकरिता पर्वणी ठरते आहे.
विद्यापीठाचे कलिना संकुल तब्बल २३० एकर जमिनीवर वसले आहे. गेल्या काही वर्षांत इथे अनेक इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी अजूनही बरीच जमीन मोकळी आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे वृक्ष, झुडपे, पाणथळीही पाहायला मिळतात. विविध प्रकारच्या जैवविविधतेने हा परिसर समृद्ध असल्याने भक्ष्याच्या शोधात येणाऱ्या पक्ष्यांचा येथे चांगलाच वावर असतो. नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येथे मोठय़ा संख्येने अनेक स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्षीही पाहायला मिळतात. परंतु गेल्या काही वर्षांत येथील परदेशी पक्ष्यांचा वावर वाढला आहे.
हे पाहुणे पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेशातून नव्हे, तर थेट युरोप, उत्तर अमेरिकेतून येतात. यंदा ब्लॅक विंग स्टिल्ट्स, ग्लॉस-आयबिस, सॅण्ड पायपर, ब्लू थ्रोट, रोझी पॅस्टर हे युरोप, उत्तर अमेरिकेतून आलेले पक्षी येथे मोठय़ा संख्येने पाहायला मिळत आहेत, असे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे संचालक प्रा. नीरज हातेकर यांनी सांगितले. अर्थशास्त्राच्या अध्ययनाबरोबरच पक्षी निरीक्षणाचीही आवड असल्याने प्रा. हातेकर यांनी येथे दिसणाऱ्या अनेक देशीविदेशी पक्ष्यांना कॅमेऱ्यातही बंदिस्त केले आहे. या शिवाय नॉर्दन पिंटेल, कॉमन टील, नॉर्दन शॅव्हेलर, लेसर व्हिसलिंग टील, नॉप बिल्ड डक, स्पॉट बिल्ड डक, गॅडवाल आदी तब्बल आठ प्रकारची परदेशी बदके इथल्या पाण्यात मनसोक्त विहार करताना दिसत आहेत. ‘मार्श हेरियर’ नावाचा शिकारी पक्षीही पाहायला मिळाल्याचे हातेकर यांनी सांगितले.
मुंबईतील बांधकाम क्षेत्र वाढल्याने आणि पाणथळीच्या, खाजण जमिनी कमी झाल्याने विद्यापीठात या पक्ष्यांचा वावर गेल्या काही वर्षांत वाढू लागला असावा, असे पक्षीतज्ज्ञ आदेश शिवकर यांनी सांगितले. महाराष्ट्र निसर्ग उद्यान, महालक्ष्मी रेसकोर्स, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी ही मुंबईतील हिरवाईची काही बेटे आहेत. या ठिकाणी पक्ष्यांचा वावर नेहमीच जास्त असतो. काही छोटय़ामोठय़ा ठिकाणी पाणथळीच्या ठिकाणी पक्षी वावरत असतात. इतर ठिकाणीही या पक्ष्यांची संख्या अधिक आढळून येते. म्हणून मुंबईतील पाणथळीच्या जागा टिकल्या पाहिजेत,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
पाकिस्तानी ‘स्टोन चॅट’ची मैफल
राजकीय साठमारीत पाकिस्तानी कलाकारांच्या मुंबईतील मैफलींवर गदा आली असली सुदैवाने याचा फटका पक्ष्यांना बसलेला नाही. त्यामुळे, पाकिस्तानातून आलेला ‘स्टोन चॅट’ नामक अत्यंत सुंदर पक्षीही येथे मुक्तपणे विहरताना दिसून येतो आहे.