प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश नंदा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. २० मे रोजी वयाच्या ८० वर्षी नंदा यांनी वृद्धाश्रमात अखेरचा श्वास घेतला. वृद्धाश्रमातील लोकांनीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. नंदा वृद्धाश्रमात असताना त्यांच्या कुटुंबियांनी एकदाही त्यांची विचारणा केली नाही, असे वृद्धाश्रमात काम करणाऱ्यांनी सांगितले.

‘पिक पॉकेट’ (१९६२), ‘प्रोफेसर एक्स’ (१९६६), ‘बेहरुपिया’ (१९७१), ‘नतीजा’ (१९६९) आणि ‘संत तुकाराम’ (१९६५) यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यांनी ‘ढोल जानी’ (१९६२) या पंजाबी चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. विनोद खन्ना, धिरज कुमार, हेलन, ज्युनिअर मेहमूद, के एन सिंग आणि इतरही काही नामवंत कलाकारांनी त्यांच्यासोबत काम केले होते.

जवळपास दीड वर्षांपूर्वी आकुर्डीत संत बाबा मोनी साब आनंद आश्रम चालविणारे प्रसिद्ध गझल गायक अशोक खोसला यांना गीतकार सुधाकर शर्मा यांनी फोन केला होता. त्यावेळी कुटुंबाने सर्व नाती तोडलेल्या एका वृद्ध व्यक्तीची तब्येत ठीक नसल्याचे त्यांनी खोसला यांना सांगितले. यानंतर शर्मा आणि त्यांच्या मित्रमंडळींनी त्या वृद्ध व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या मदत केली. पण त्यांना फार काळ ही मदत करता आली नाही. ती वृद्ध व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून चित्रपट दिग्दर्शक राजेश नंदा होते.

वृद्धाश्रमातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ महिन्यांपूर्वी नंदा यांना मुंबईहून आश्रमात आणण्यात आले. त्यांची कोणीच काळजी घेत नसल्याचं सुधाकर यांनी खोसलांना सांगितले. हॉस्पिटलमधून आश्रमात आणल्यानंतर नंदा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. पण, वाढत्या वयामुळे त्यांना काहीनाकाही आजाराला सामोरं जावं लागत होतं. या दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने फोन करून एकदाही त्यांच्याबद्दल विचारले नाही.