भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मंगळवारी  संध्याकाळी ५ वाजता निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना अंधेरीच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुप्फुसात संसर्ग झाल्याने त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते.  वहानवटी यांची २००९ मध्ये भारताच्या अ‍ॅटर्नी जनरलपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली होती २०१२ मध्ये हा कालावधी दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर २७ मे रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. वहानवटी यांनी भारताच्या सॉलिसिटर जनरलपदी २० जून २००४ ते ७ जून २००९ या काळात काम केले होते. त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून काम पाहिले होते. ७ मे १९४९ रोजी जन्म झालेल्या वहानवटी यांनी सेंट झेवियर्समधील पदवीनंतर मुंबईच्या विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली होती.