शिक्षा रद्द करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार!

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव हे गुप्तहेर नव्हते. तरीही त्यांना खोटय़ा गुन्ह्य़ात अडकविण्यात आल्याचा सुरुवातीपासूनचा आमचा दावा ठाम आहे. आता पाकिस्तान लष्कराने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावून त्यावर कहरच केला आहे. ही शिक्षा रद्द व्हावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांच्या निकटवर्तीय सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत जाधव कुटुंबीय अधिकृतपणे बोलण्यास तयार नाही.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
pm narendra modi rally in meerut
भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा थांबणार नाही! मेरठच्या सभेत पंतप्रधानांचा इंडिया आघाडीला इशारा
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले वडील सुधीर जाधव आणि काका सुभाष जाधव यांनी कुलभूषण यांच्या सुटकेसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न त्याच्या अटकेपासूनच सुरू केले आहेत. त्यातच मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेल्यामुळे जाधव कुटुंबीय अस्वस्थ झाले आहे. या शिक्षेविरुद्ध अपील करता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे. वांद्रे विभागाचे साहाय्यक आयुक्त म्हणून निवृत्त झालेले कुलभूषण यांचे वडील सुधीर हे सतत दिल्लीवारी करून आपल्या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत होते. या वृत्तानंतर त्यांनाही धक्का बसला. परंतु तरीही शिक्षा रद्द व्हावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे या सूत्रांनी सांगितले.

पवईच्या हिरानंदानी संकुलातील ‘सिल्व्हर ओक’ इमारतीत राहणारे जाधव कुटुंबीय सध्या पुणे येथे वास्तव्यास आहेत. आज त्यांच्यावरील कारवाईचे वृत्त प्रसृत होताच त्यांच्या पवई येथील इमारतीकडे माध्यमांच्या प्रतिनिधींनी धाव घेतली, परंतु इमारतीतील अन्य रहिवाशांनी सर्वानाच प्रवेश देण्यास मज्जाव केला. जाधव कुटुंबीयदेखील याबाबत प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. कुलभूषण यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेने त्याचे ना. म. जोशी मार्गावरील पोलीस वसाहतीतील मित्रही हेलावले आहेत. दादरच्या राजा शिवाजी विद्यालयातील कुलभूषण यांचा सुरुवातीपासूनच लष्करी सेवेकडे ओढा होता. दहावीनंतर त्यांची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत निवड झाली आणि नंतर नौदल अधिकारी म्हणून सेवेत आले. या काळात वडील सेवानिवृत्त झाल्याने पोलीस वसाहतीतील निवासस्थान सोडून पवईत राहावयास गेले तर त्याचे काका सुभाष जाधव हेही निवृत्त होऊन शिवाजी पार्कला राहावयास गेले. मात्र त्यानंतरही कुलभूषण ना. म. जोशी मार्ग परिसरात आवर्जून यायचा, असे त्याचे तेथील मित्र तुळशीदास पवार आणि सुब्रतो मुखर्जी सांगतात.

लहानपणापासून ‘भूषण’ या नावाने परिचित असलेला कुलभूषण बच्चे कंपनीत ‘भूषणदादा’ या नावाने लोकप्रिय होता. फुटबॉलप्रेमी असलेला कुलभूषण वेळ मिळेल तेव्हा मित्रांसमवेत फुटबॉल अवश्य खेळायचा. नौदलातील पासिंग परेडसाठी त्याने पोलीस वसाहतीतील आपल्या सर्व मित्रांना नेले होते. त्यानंतरही जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा तो आवर्जून यायचा. याच मित्रांना घेऊन तो काश्मीरमध्येही गेला होता. देशसेवेचे व्रत घेतलेल्या कुलभूषण यांना सुरुवातीपासूनच लष्करी सेवेचे आकर्षण होते. सुटीच्या कालावधीत तो अनेक रोमांचकारी किस्से आपल्या मित्रांना सांगायचा. बच्चे कंपनीतही लष्करात सामील होण्यासाठी प्रेरित करायचा, असे त्याचा मित्र सुब्रतो मुखर्जी यांनी सांगितले.

हळवा कुलभूषण..

कुलभूषण मनाने खूप हळवा आहे, असे सांगताना त्याचा मित्र तुळशीदास पवार याने सांगितले की, असाच तो एकदा सुटीनिमित्त ना. म. जोशी मार्ग परिसरात आला होता. त्या वेळी पदपथावर एक भिकारी महिलेच्या डोक्याला जखम झालेली आढळली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता तिला उचलले आणि आपल्या गाडीतून रुग्णालयात नेले.