भारतातील मुलींचे शिक्षणातील प्रमाण कमी असून हे प्रमाण वाढविण्यासाठी देशातून होणारे प्रयत्न कमी पडत असल्याची ओरड सर्व स्तरातून होताना दिसते. या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे माजी मंत्री व संसदपटू पॅट फार्मर यांनी पुढाकार घेतला असून ते या मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी ते भारतात आले असून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पाठिंबा दिलेल्या ‘स्पिरीट ऑफ इंडीया रन’ उपक्रमांतर्गत कन्याकुमारी ते श्रीनगपर्यंतचा ४६०० किलोमीटरचा टप्पा धावत पूर्ण करताना ते मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांचे मुंबईत आगमन झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ट्रायडेंट हॉटेल येथे आयोजीत स्वागत समारंभात राज्याच्या पर्यटन सचिव वलसा नायर-सिंग यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचे माजी शिक्षण, विज्ञान व प्रशिक्षण मंत्री तसेच ८ वर्षे संसदपटू राहीलेले पॅट फार्मर सध्या भारत दौऱ्यावर असून ‘स्पिरीट ऑफ इंडीया रन’ या उपक्रमांतर्गत ते कन्याकुमारी ते श्रीनगर हा ४६०० किलोमीटरचा टप्पा ६० दिवसात पूर्ण करणार आहेत.
२६ जानेवारीपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास येत्या ३१ मार्चला श्रीनगरला संपणार असून त्यांच्या या उपक्रमाला केंद्रीय पर्यटन मंत्रालय व परराष्ट्र मंत्रालय तसेच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, पंजाब व जम्मू आणि काश्मिर आदी राज्यांच्या पर्यटन विभांगानी पाठिंबा दिला आहे. गेल्या २० वर्षांत १४ देशांमध्ये त्यांनी मॅरेथॉन पूर्ण केल्या असून सध्या ते भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी व येथील मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारण्याच्या हेतूने ‘स्पिरीट ऑफ इंडीया रन’या उपक्रमांतर्गत धावत आहेत.
दररोज, ७० ते ८० किलोमीटर धावणारे फार्मर गुरूवारी गुजरात राज्याकडे प्रस्थान करणार आहेत. त्यांच्या या धावण्याच्या प्रवासावर ‘एक क्षण एक पाऊल’ हा माहितीपर लघुपटाचीही निर्मिती करण्यात येत आहे.

न भूतो न भविष्यती स्वागत – पॅट फार्मर
भारतीय लोकांना अनभवून मला देखील सामान्य भारतीय झाल्यासारखे वाटत असून न भूतो न भविष्यती असे माझे स्वागत स्थानिक भारतीय जनतेने केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचे संबंध आधिक दृढ व्हावेत तसेच भारतीय पर्यटनाला चालना मिळावी आणि येथील मुलींच्या शिक्षणाला हातभार लागावा यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. भारतीय संस्कृती अनुभवताना माझ्या अंतरंगात बदल झाला आहे. या उपक्रमादरम्यान भारत सरकार, पर्यटन खाते, पोलिस, वाहतूक विभाग आदींनी मला मोलाचे सहकार्य केल्याने मी त्यांचा कायमचा ऋणी आहे.