भायखळ्याजवळील फेरबंदर, घोडपदेव परिसरातील एक मजली चाळीला मंगळवारी सायंकाळी भीषण आग लागली. घरातील पाच सिलेंडरचा स्फोट झाल्याने भडकलेल्या आगीत संपूर्ण चाळ भस्मसात झाली असून, आग विझविताना अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्र अधिकारी आणि तीन जवान जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. येथील एकही रहिवासी या दुर्घटनेत जखमी झाला नाही.
फेरबंदर, घोडपदेव येथील रामभाऊ भोगले मार्गावरील हिरजी भोजराज चाळीला सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास आग लागली. काही क्षणातच आगीने पहिल्या मजल्यावरील सर्वच २० खोल्यांना वेढले. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी रवाना झाले. चाळीमध्ये पसरलेल्या आगीमुळे पाच स्वयंपाकाच्या सिलिंडरचा स्फोट झाला आणि आगीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले.
चाळीला आग लागताच रहिवासी तातडीने रस्त्यावर उतरले. त्यामुळे ते बचावले. मात्र चाळीला पडलेला आगीचा वेढा आसपास पसरू नये म्हणून अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चाळीवर पाण्याचा जोरदार मारा केला जात होता. मात्र अधूनमधून स्वयंपाकाच्या सिलिंडरचे स्फोट होत होते. त्यामुळे आगीचा भडका आणखी वाढत होता. सिलिंडरच्या स्फोटामुळे भडकलेल्या आगीत अग्निशमन दलाचे सहाय्यक केंद्र अधिकारी प्रशांत आबा सारंग (४५), अग्निशमन जवान मोहन मारुती दुर्वे (३२), निवृत्ती सखाराम इंगळे (४३) आणि अशोक गुणाजी गोवलकर (४०) हे जखमी झाले. या चौघांनाही तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी दिली.
हिरजी भोजराज चाळीमध्ये तळमजल्यावर २० व पहिल्या मजल्यावर २० अशा एकूण ४० खोल्या होत्या. या सर्वच खोल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. मोठय़ा प्रयत्नांनंतर सायंकाळी पावणेसातच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, चाळ आगीत भस्मसात झाल्यामुळे ४० कुटुंबांची घोडपदेवमधील संघर्ष सदनच्या हॉलमध्ये तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून, मंगळवारी सकाळी आसपासच्या परिसरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घराच्या चाव्या या रहिवाशांना देण्यात येतील, असे आश्वासन म्हाडा अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी दिली.