शनिवारी पूर्व मुक्त मार्गाखाली अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने महिलेचा मृत्यू झाल्यानंतर रविवारी रात्री या मार्गावर अपघातात चार जण जखमी झाले. एका भरधाव टॅक्सीचे नियंत्रण सुटून त्याने पुढील वाहनाला धडक दिली. जखमींतील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रात्री साडेनऊच्या सुमारास टॅक्सी प्रवाशांना घेऊन मुक्त मार्गावरून चेंबूरच्या दिशेने निघाली होती. दहाच्या सुमारास या टॅक्सीने पांजरपोळ बोगद्याच्या पुढे एका खाजगी वाहनाला धडक दिली. या अपघातात टॅक्सीचालकासह चार प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरसीएफ पोलीस ठाण्यात या प्रकरणी टॅक्सीचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शनिवारीसुद्धा  मुक्त मार्गाच्या खाली माहूल गाव येथे एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पदपथावर राहणाऱ्या अनोळखी महिलेचा मृत्यू झाला होता. ९ जूनला जान्हवी गडकर या महिला वकिलाच्या ऑडी गाडीने मुक्त मार्गावर टॅक्सीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता.
दुचाकी अपघातात तरुण ठार
सोमवारी सकाळी वांद्रेच्या सागरी सेतूजवळील एका मोटारसायकलीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला. जाफर हुसेन सय्यद (१८) असे या तरुणाचे नाव असून तो बेहरामपाडा येथे राहणारा आहे. त्याच्या मागे बसलेला शोएब शेख जखमी झाला आहे. सकाळी सातच्या सुमारास ते सागरी सेतूच्या दिशेने निघाले होते. मोटारसायकलीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.