वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीत धुमाकूळ घालणाऱया ‘चड्डी-बनियन’ टोळीतील चार गुंडांना पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मुंबई पोलिसांनी या टोळीच्या विरोधात मोहिम उघडली होती. रविवारी रात्री बोरिवलीमधील शिंपोली भागात पोलिसांनी ‘चड्डी-बनियन’ टोळीच्या धडक कारवाई केली.
चड्डी-बनियन टोळीचा धुमाकूळ
बोरीवलीतील साईकृपा सोसायटीमध्ये रविवारी रात्री या टोळीने एका घरात दरोडा टाकला होता. यावेळी सोसायटीमधील एका नागरिकाने दरोडेखोरांना पाहिले. त्याने त्वरित याबाबत पोलिसांना माहिती दिली. बोरिवली पोलिसांनी धडक कारवाई करत तिघांना अटक केली. दरम्यान, दरोडेखोरांची धरपकड सुरू असताना पोलिसांना गोळीबार देखील करावा लागला. तिघांना अटक केल्यानंतर चौथ्या दरोडेखोराने दगडफेक करून पोलिसांना जखमी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यानंतर काही वेळाने पोलिसांना चौथ्या दरोडेखोरालाही जेरबंद करण्यात यश आले. दरम्यान, या टोळीतील तिघे जण झुडपात पसार झाले. बोरीवलीच्या जंगलात त्यांचा शोध सुरू आहे. बऱयाच महिन्यांपासून मुंबई-ठाणे उपनगरांमध्ये घरफोडी करून या टोळीने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती.