गुंजवली धरणाचे काम दोन महिन्यांमध्ये पूर्ण करून पुरंदर आणि भोर या दोन तालुक्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्याचा निर्धार जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केला असल्याने बारामतीला सध्या मिळणारे चार टीएमसी पाणी बंद होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच थेट आव्हान देण्याचा शिवसेनेच्या राज्यमंत्र्याचा हा प्रयत्न आहे.
पुरंदर आणि भोर तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी चार टीएमसीचे धरण बांधण्याचा निर्णय १९९२मध्ये झाला. २००५मध्ये या धरणाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले. मात्र त्यानंतर सूत्रे फिरली आणि धरणाचे घळ भरणीचे केवळ पाच टक्के काम गेल्या काही वर्षांपासून अर्धवटच राहिले होते. परिणामी या धरणात अडणारे चार टीएमसी पाणी नीरा नदी- वीर धरणाच्या मार्गाने बारामतीकरांना मिळत होते. जलसंपदा खात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी या धरणाच्या अर्धवट कामामागील गुपित लक्ष्यात येताच नेमका त्याच्यावरच घाव घातला आहे. त्यांच्याच पाठपुराव्यानंतर आता धरणाच्या कामातील पुनर्वसन आणि न्यायालयीन अडचणी दूर झाल्या असून उर्वरिच पाच टक्के काम पूर्ण करण्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे धरणाचे थांबलेले काम पुन्हा गतीने सुरू झाले असून दोन तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.
याबाबत राज्यमंत्री विजय शिवतारे यांना विचारले असता, कोदापूर, काणंद आणि भासलेवाडी या गावांच्या पुनर्वसन गावठाणावर स्थगिती आदेश होता. तो उठविण्यात आला असून गुंडवणी धरणाला लवकरच दरवाजे बसविले जातील. त्यामुळे  गेल्या  १९ वर्षांपासून  पळविले जाणारे भोर आणि पुरंदर तालुक्याच्या हक्काचे पाणी अडविले जाणार असल्याचे शिवातरे यांनी सांगितले. या पाण्यामुळे भोर तालुक्यातील ८ हजार ५३० तर पुरंदर तालुक्यातील ६ हजार ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्याचप्रमाणे धरणाचे पाणी कालव्याऐवजी बंद जलवाहिनीने दिले जाणार असल्याचेही त्यांनी यांनी सांगितले.