कांदळवनांतून वस्तीत शिरकाव

कांदळवनांमध्ये वास्तव्य असलेल्या कोल्ह्यांच्या टोळीतून भरकटलेला एक कोल्हा बुधवारी सायंकाळी विक्रोळीतील गोदरेज कामगार वसाहतीमध्ये पडला होता. या कोल्ह्यच्या ओरडण्याने सतर्क झालेल्या रहिवाशांनी ‘रॉ’ या प्राणिमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढले. या कोल्ह्यला दुखापत झाली असून उपचारांसाठी त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले आहे.

विक्रोळीतील फिरोजशहानगरमधील गोदरेज कामगार वसाहतीमधील एका खड्डय़ातून बुधवारी सायंकाळी कोल्हेकुई ऐकू आल्यानंतर रहिवाशांनी तेथे धाव घेतली. तसेच वन विभाग आणि ‘रॉ’ संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यात आला. ‘रॉ’चे प्राणिमित्र चिन्मय जोशी, प्रतीक भानुशाली, अद्वैत जाधव, पवन शर्मा, विवेक, राजीव यांनी जखमी झालेल्या कोल्ह्यला बाहेर काढले. त्यानंतर त्याला वन विभागाकडे सोपवण्यात आले. ‘गोल्डन जॅकल’ जातीचा हा कोल्हा दीड-दोन वर्षांचा असून त्याच्या एका पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले आहे. ‘योग्य उपचार आणि देखरेख ठेवून काही दिवसांनंतर त्याला सोडण्यात येईल,’ अशी माहिती उद्यानातील डॉ. शैलेश पेठे यांनी दिली.

गेल्या काही दिवसात कोल्ह्यंकडून मानवावर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विक्रोळीतील गोदरेज उद्योग समूहात कार्यरत राकेश शुक्ला या सुरक्षारक्षकावर कोल्ह्यने हल्ला केला होता. तसेच भांडूप येथील पालिका कार्यालयाचे सुरक्षारक्षक चेतन पाटील यांच्यावरही कोल्ह्यने हल्ला केल्याचे समोर आले आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

भक्ष्याच्या शोधात घुसखोरी

मुंबईभर पसरलेल्या कांदळवनांमध्ये कोल्हे मोठय़ा संख्येने वास्तव्यास असून हा कोल्हा त्यापैकीच एक असावा, असा अंदाज ‘रॉ’ संघटनेचे पवन शर्मा यांनी व्यक्त केला. पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या कांदळवनांतील कोल्हे भक्ष्याच्या शोधात मानवी वसाहतीत येत असल्याचे ते म्हणाले. परंतु, येथे भटकी कुत्री त्यांच्यावर हल्ला करतात, अशी माहिती त्यांनी दिली.