श्रीनिवास मिल पुनर्विकास प्रकल्पात १२ जणांची फसवणूक

लोअर परळ येथील खासगी श्रीनिवास मिलच्या भूखंडावर जागतिक कीर्तीचा ‘वर्ल्डवन’ हा उत्तुंग टॉवर उभारणाऱ्या लोढा बिल्डर्सच्या तत्कालीन संचालक तसेच अभियंत्यांनी १२ भाडेकरूंची फसवणूक करून घरे लाटल्याचा दावा करीत या प्रकरणी स्थगिती मिळावी, यासाठी भाडेकरू न्यायालयात गेले आहेत.

श्रीनिवास मिल ही १९९३ मध्ये दिवाळखोरीत निघाली आणि या गिरणीचा ताबा उच्च न्यायालयाच्या अवसायन (लिक्विडेटर) विभागाने घेतला. लोढा डेव्हलपर्सने विकास नियंत्रण नियमावलीनुसार ५८ अंतर्गत प्रस्ताव देत आपल्या महत्त्वाकांक्षी ‘वर्ल्डवन’ या प्रकल्पाचा पाया रोवला.

या नियमानुसार एकतृतीयांश भागात विद्यमान भाडेकरूंना घरे बांधून देणे बंधनकारक होते. ‘म्हाडा’च्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने या भाडेकरूंची पात्रता यादी जारी केली. त्यापैकी १३२ भाडेकरूंना पात्र तर १८ भाडेकरूंना अपात्र ठरविले. हे आदेश येताच यापैकी १२ भाडेकरूंना तुमची घरे आता जमीनदोस्त केली जातील. तुम्हाला लाभ मिळणार नाही, असा दावा करीत लोढा बिल्डर्सच्या तत्कालीन संचालक, अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी ही घरे नोंदणीकृत नसलेल्या मुखत्यारपत्र तसेच करारनाम्याच्या जोरावर ताब्यात घेतली.

या बदल्यात १२ भाडेकरूंची फुटकळ आर्थिक मोबदला देऊन बोळवण करण्यात आली. आपल्याला घरे मिळणार नाहीत, असे वाटून मिळालेली रक्कम पदरात घेत हे भाडेकरू निघून गेले. परंतु महापालिकेने उर्वरित १८ भाडेकरूंची यादी अंतिम करण्यासाठी जी नोटीस काढली त्यात आपली नावे पाहून आपण फसविले गेल्याचे या भाडेकरूंना समजून चुकले. या भाडेकरूंच्या नावांसमोर लोढा बिल्डर्सचे संचालक, अभियंते आणि कर्मचारी यांची नावे नमूद असल्यामुळे भाडेकरू हादरले. ही घरे लाटण्यातच आली आहेत, असा आरोप करीत आता भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेतली आहे.

या प्रकरणी श्रीनिवास मिल प्रकल्पाचे प्रतिनिधी म्हणून पीयूष ठक्कर यांनी शहर व दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात या भाडेकरूंनी पैशाच्या मोबदल्यात आपले हक्क सोडल्याचे नमूद केले आहे.

मात्र भाडेकरूंची फसवणूक करूनच घरे लाटल्याचे या भाडेकरूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अ‍ॅड. सागर कांबळे यांनी स्पष्ट केले असून या वितरणाला स्थगितीसाठी अर्ज सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या भाडेकरूंची घरे लाटल्याचा आरोप

विजय जामसंडेकर, सुवर्णा निमांडे, सुनंदा पोकळे, जयश्री तोडकरी, स्वाती नलावडे, अजय परब आणि सविता बिरवडकर, शीला जाधव, आशा परब, भगवान पाटील, जितेंद्र परब, हिराराम सुतार या भाडेकरूंची घरे लाटल्याचा दावा केला जात आहे. यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.