मुंबईत सुट्टी घालविण्यासाठी आलेल्या एका अमेरिकी नागरिकाला एशियाटिक लायब्ररीजवळ चार भामटय़ांनी लुटले. रविवारी दुपारी ही घटना घडली. भिकारी बनून आलेल्या या चौघांनी या अमेरिकन वृद्धाला लुटून त्याच्याकडील रोख रकमेसह त्याचा पासपोर्टही चोरून नेला.
न्यूयॉर्क येथे राहणारे अमेरिकी नागरिक अ‍ॅन्थनी कम्पोर्ट (७८) हे पत्नीसह मुंबईत फिरण्यासाठी आले होते. कुलाब्याच्या ताज हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते टॅक्सीने एशियाटिक लायब्ररी येथून ताज हॉटेलमध्ये जात होते. त्यावेळी हॉर्निमन सर्कल येथे त्यांची टॅक्सी बंद पडली. टॅक्सी देना बँकेच्या कडेला लावून टॅक्सीचालक मेकॅनिकला आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी कम्पोर्ट टॅक्सीतून खाली उतरले होते तर त्यांची पत्नी टॅक्सीमध्ये बसली होती. त्यावेळी भिकारी बनून दोन इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी पाय पकडून भीक मागण्याचे नाटक केले. त्याचवेळी मागून आलेल्या दोघांनी त्यांच्या पँटच्या खिशातील पाकीट काढले आणि चौघेही काही क्षणात फरार झाले, अशी माहिती माता रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदमाकर जुईकर यांनी दिली. त्यांच्या पाकिटात पासपोर्ट, सिटी बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड, रोख ४ हजार रुपये आणि ४०० अमेरिकी डॉलर किंमतीचे ट्रॅव्हलर्स चेक्स होते. भिकारी बनून विदेशी पर्यटकांना लुटण्याचे प्रकार यापूर्वी कफ परेड, मरिन ड्राइव्ह आणि माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहेत. त्या प्रकरणांमध्ये यापूर्वी अटक केलेल्या आरोपींकडेही पोलीस तपास करत आहेत.