इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए)ने स्थापन केलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम शैक्षणिक आणि संशोधन केंद्रात दारिद्रय़रेषेखालील मुलांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. प्रभादेवी येथील आयडीएच्या मुख्यालयात हे केंद्र स्थापन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन रविवारी विज्ञान तंत्रज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले.

हे संशोधन केंद्र असून तेथे सुपरस्पेशालिटी दंत चिकित्सालयाची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रात गरीब मुलांच्या दाताच्या देखभालीची विशेष काळजी घेण्यात येणार असून त्यांना येथे मोफत उपचार करून मिळतील अशी माहिती हर्षवर्धन यांनी उद्घाटनप्रसंगी दिली. संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानामध्ये वृद्धी होते आणि कौशल्यविकास साधला जातो. तंत्रज्ञानातील सुधारणा आणि नवीन सामग्रीचा झालेला विकास यामुळे दंत आरोग्यसेवेचा दर्जा फार मोठय़ा प्रमाणावर सुधारला आहे, असेही डॉ. हर्षवर्धन म्हणाले. तर या केंद्रावर सर्वच आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून त्यातून दातांच्या शल्यचिकित्सकांना दंत संशोधन व्यावसायिक आधुनिकतेचा प्रसार करण्यासाठी मदत केली जाणार आहे. त्यातूनही गरीब रुग्णांना मदत करण्यावर भर असेल, असे आयडीएचे मानद सचिव डॉ. अशोक ढोबळे म्हणाले. दंतचिकित्सेमध्ये सध्या अगदी थोडे संशोधन होते आहे. संशोधनातून पुढे आलेल्या गोष्टींतून सध्या रूढ असलेल्या प्रथा बदलण्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर संधी उपलब्ध होते. त्यातून अधिक चांगली आणि विश्वासपूर्ण आरोग्यनिगा सेवा देता येणे शक्य होईल असेही ते म्हणाले. दंतवैद्यकीय विद्यार्थ्यांना संशोधन आणि अभ्यास करण्यासाठी २५ सिमुलेटर्स ठेवण्यात आले आहेत.