भारतीय रेल्वेच्या शिरपेचातील मानाचा तुरा असलेले आणि हेरिटेज दर्जा असलेले मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्याच्या दृष्टीने रेल्वेने आणखी एक पाऊल उचलले आहे. रेल्वे मंत्रालयाने देशभरातील सर्व ‘अ’ दर्जाच्या स्थानकांमध्ये वाय-फाय सुविधा देण्याचे निर्देश दिल्यानंतर आता मध्य रेल्वेने आपल्या सर्वात महत्त्वाच्या स्थानकावर ही सेवा पुरवण्याचे ठरवले आहे. ही सेवा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये वाय-फाय सेवा सुरू करण्यासाठी स्थानकातील २५ ठिकाणे निवडण्यात आली आहेत. या ठिकाणी वाय-फाय सेवा पुरवण्यासाठीची प्रणाली बसवण्यात येईल. मात्र ही प्रणाली बसवण्यासाठीची परवानगी, वाय-फाय सुविधा पुरवण्याबाबतचे धोरण, महसूल आदी गोष्टींबाबत अद्याप अंतिम निर्णय न झाल्याने ही सुविधा सुरू होण्यास विलंब लागत आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत इंटरनेट सेवा रेलनेट महामंडळातर्फे पुरवली जाते. याच रेलनेटतर्फे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे ही सेवा पुरवण्यात येईल.
ही सेवा प्रवाशांना किती वेळासाठी मोफत द्यायची, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करायच्या, याबाबतही रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये विचारविनिमय सुरू आहे. ही वाय-फाय सुविधा १५ मिनिटे किंवा अध्र्या तासासाठी मोफत देऊन त्यासाठी ‘वन टाइम पासवर्ड’ची व्यवस्था करण्याबाबत विचार सुरू आहे. ही वाय-फाय सुविधा मोफत पुरवल्यास केवळ वाय-फाय सुविधेसाठी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू शकते. मात्र १५ मिनिटे मोफत सेवा आणि त्यापुढील वापरासाठी शुल्क लागू केल्यास केवळ या गोष्टीसाठी स्थानकात येणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल, असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.