देशाच्या राजकारणात एक काळ असा आला होता की भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना अस्पृश्य मानलं जायचं, कोणीही आपल्याला साथ दिली नाही. आजचं चित्र बघा सगळे येत आहेत ‘आ गले लगजा’ अशी आजची स्थिती आहे. सगळ्यांना आता एन.डी.ए.मध्ये यायचं आहे कारण आता आपण सत्तेवर आहोत. मात्र एक काळ असा होता जेव्हा शिवसेना आणि भाजप हे दोनच पक्ष एकमेकांच्या सोबत राहिले आणि पुढे आले असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखतींचा द्विखंडीय संग्रह असलेलं ‘एकवचनी’ हे पुस्तक आज मुंबईत प्रकाशित करण्यात आलं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला नैसर्गिक मैत्रीची आठवण करून दिली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची उपस्थिती होती, त्यांच्या उपस्थितीतच, तुमच्यासोबत कोणीही नव्हतं तेव्हा आम्ही होतो याची आठवण आज उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

शिवसेना आणि भाजप एकमेकांसोबत आहेत याचं मुख्य कारण बाळासाहेब ठाकरे यांची दूरदृष्टी होती. त्या काळी विले-पार्ले येथील पहिली पोटनिवडणूक हिंदुत्त्व हा मुद्दा पुढे ठेवून लढली आणि जिंकली होती याचीही आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली. त्या विजयानंतर हिंदुत्त्वाचं वातावरण आपल्या देशात निर्माण झालं.

यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेक सभांमधून भाजपला आवाहन केलं की आपण दोघेही एकाच विचारांचे पक्ष आहोत मतं कशाला फोडायची त्यापेक्षा एकत्र येऊया, देश तुम्ही सांभाळा महाराष्ट्र आम्ही सांभाळतो, एकत्र येऊया. त्यानंतर प्रमोद महाजन आले आणि शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची युती झाली. आज देशाचं राजकारण हिंदुत्त्वाच्या दिशेनं चाललं आहे याचा पाया शिवसेना प्रमुखांनी २५ वर्षांपूर्वी घातला होता.असंही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं

लोकमान्य टिळक आणि बाळासाहेब सारखेच
आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी लोकमान्य टिळक आणि बाळासाहेब ठाकरे यांचा स्वभाव कसा मिळताजुळता होता याचंही वर्णन केलं आहे. लोकमान्य टिळक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वात साम्य आढळून येतं. लोकमान्यांना ‘असंतोषाचे जनक’ म्हटलं जातं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच ही प्रतिज्ञा टिळकांनी इंग्रजांची सत्ता देशावर असताना ठामपणे घेऊन दाखवली. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ हा अग्रलेख इंग्रजांच्या विरोधात लिहून दाखवला.

त्याचप्रमाणे ‘गर्वसे कहो हम हिंदू है!’ ही बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली घोषणा होती, हिंदू हे नाव उच्चारण्याची हिंमत जेव्हा कोणाची नव्हती तेव्हा त्यांनी ही घोषणा दिली. ठणकावून बोलणं हा त्यांचा स्वभाव विशेष होता. टिळक आणि बाळासाहेब यांच्यात ही साम्यस्थळं आढळून आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

भाऊ रंगारी, टिळक वादावरही भाष्य
पुण्यात पहिला गणपती कोणीही बसवला याचा वाद सुरू आहे हे दुर्दैवी आहे, लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सवाची चळवळ केली हे आपण विसरता कामा नये. भाऊ रंगारींनी जर पहिला सार्वजनिक गणपती बसवला असेल तर त्यांना श्रेय जरूर द्या पण लोकमान्य टिळकांचं महत्त्व कमी करू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.