देशातील पाच शहरांमध्ये इंधनाचे दर दिवशी बदलण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यावर आता १६ जूनपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. दर दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करण्याच्या निर्णयाने त्याचा ग्राहकांनाही फायदा होतो. १६ ते २२ जून या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर अडीच टक्क्यांनी घटले होते. (४५.६ डॉलर्स बॅरेलवरून ४४.४५ डॉलर्स) त्यातून आपल्याकडे पेट्रोलचे दर १.६ टक्के तर डिझेलचे दर एक टक्क्याने घटले.

दर दिवशी कधी आणि कसे निश्चित केले जातात ?

  • आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, डॉलर्स आणि रुपये यांचा विनिमय दर, मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत या आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित केले जातात. दर दिवशी सकाळी ६ वाजता त्या त्या दिवसाचा दर अमलात येतो. आधल्या दिवशी रात्री ८ वाजता पेट्रोल दुकानदारांना दुसऱ्या दिवशीचा दर कळविला जातो.

प्रत्येक दिवशी दर निश्चित करण्याचा फायदा कोणाला होतो?

  • दर दिवशी दरात बदल केल्याचा फायदा इंधन पुरवठादार कंपन्या आणि ग्राहकांना होतो. आंतरराष्ट्रीय दरात वाढ झाल्यास त्याचा साहजिकच फटका ग्राहकांना बसतो. पण ही योजना अमलात आल्यावर पहिल्या आठवडय़ात ग्राहकांचा फायदा झाला आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांना झाला. ही योजना अमलात आल्याने अधिक पारदर्शकता येणार आहे.

अन्य कोणत्या देशांमध्ये दर दिवशी इंधनाचे दर निश्चित केले जातात का?

  • अमेरिका आणि अन्य युरोपियन राष्ट्रांमध्ये इंधनाचे दर दिवशी निश्चित केले जातात. बहुतांशी विकसित राष्ट्रांमध्ये दर दिवसागणिक बदलले जातात. काही राष्ट्रांमध्ये दिवसात दोनदा इंधनाच्या दरात बदल केले जातात.

ग्राहकांना दर दिवसाचा दर कसा कळतो ?

  • इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने इंधनाचे दर ग्राहकांना अवगत व्हावा म्हणून विशेष अ‍ॅप तयार केला आहे. (फ्यूअल @ आयओसी).

घरगुती वापराचा गॅस आणि अन्य पेट्रोलियम पदार्थाच्या दरासाठी ही योजना अमलात आणली जाणार का?

  • सध्या तरी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलसाठीच दर दिवशी दर बदलण्याची योजना अमलात आणली आहे. घरगुती वापराचा गॅस किंवा रॉकेलचा अजून विचार झालेला नाही. विमानाचे इंधन किंवा अन्य इंधनाकरिता ही योजना लागू केली जाऊ शकते.