मराठी आणि हिंदी चित्रपटांचे ज्येष्ठ कथालेखक ग. रा. कामत यांचे मंगळवारी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी (ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत) आणि दोन कन्या असा परिवार आहे. मराठी व हिंदीतील अनेक गाजलेल्या चित्रपटांचे कथालेखन कामत यांनी केले होते.
पाच-सात दिवसांपूर्वी कामत घरात पडले होते. फ्रॅक्चर झाल्यामुळे उपचारासाठी कामत यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असल्याची माहिती कामत यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली.
‘लोकसत्ता’ दैनिकाच्या संपादकीय विभागात कामत यांनी उपसंपादक म्हणून काही काळ नोकरी केली होती.
मराठीपेक्षा कामत यांनी हिंदीत जास्त काम केले. राज खोसला यांच्या अनेक चित्रपटांसाठी कथा व पटकथा लेखन कामत यांनी केले होते. हिंदीत गाजलेल्या ‘मेरा गाव मेरा देश’, ‘कच्चे धागे’, ‘काला पानी’, दो रास्ते’, ‘पुकार’, ‘बसेरा’, ‘मनचली’, ‘मै तुलसी तेरे आंगन की’, ‘मेरा साया’ आदी चित्रपटांचे कथालेखन कामत यांनी केले होते.
‘मौज’ आणि सत्यकथा’ या मासिकांचे संपादकीय कामही त्यांनी पाहिले होते. कवी व गीतकार ग. दि. माडगूळकर हे कामत यांचे गुरू. ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटासाठी कामत यांनी माडगूळकर यांचे साहाय्यक लेखक म्हणून काम पाहिले होते. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.
काही वर्षांपूर्वी ‘झी मराठी’च्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. दरम्यान रात्री उशीरा शिवाजी पार्क स्मशानभूमीत कामत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.