लालबाग, परळमधील २० गणेश मंडळांवर कारवाई; ‘लालबागचा राजामंडळाला ४ लाख ८६ हजारांचा दंड

गणेशोत्सवासाठी मंडप, दर्शनव्यवस्था आणि जाहिराती झळकविण्यासाठी बांबू उभारण्यासाठी रस्त्यांवर केलेले खड्डे योग्य पद्धतीने न बुजविल्यामुळे पालिकेने लालबाग मार्केटमधील ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तब्बल ४ लाख ८६ हजार रुपये, लालबागच्या गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाला ४ लाख १४ हजार रुपये दंड केला आहे. उत्सवस्थळी खोदलेले खड्डे योग्य पद्धतीने न बुजविल्यामुळे लालबाग आणि परळ भागातील तब्बल २० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून या मंडळांवर पालिकेने नोटीस बजावली आहे.

गणेशोत्सवात गणेशदर्शनासाठी लालबाग, परळ भागात भाविकांची मोठी गर्दी होते. ‘लालबागचा राजा’ आणि ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी मोठी रांग लागते. या रांगेचे व्यवस्थापन करण्यासाठी पदपथावर बांबूचे कठडे उभारण्यात आले होते. तसेच काही मोक्याच्या ठिकाणी छोटे मंडप उभारण्यात आले होते. त्यासाठी रस्त्यावर खड्डे खोदण्यात आले होते. गणेशोत्सवानंतर हे खड्डे योग्य पद्धतीने भरून रस्ता, पदपथ पूर्ववत न केल्यामुळे लालबाग मार्केटमधील ‘लालबागचा राजा’ आणि गणेशगल्लीतील ‘मुंबईच्या राजा’च्या मंडळासह लालबाग, परळमधील तब्बल २० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर पालिकेने दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.

पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये ‘लालबागच्या राजा’च्या मंडळाने २४३ खड्डे योग्य पद्धतीने भरून रस्ता पूर्ववत केला नसल्याचे आढळून आले. एका खड्डय़ासाठी पालिकेकडूून दोन हजार रुपये दंड आकारण्यात येतो. त्यानुसार पालिकेने ‘लालबागच्या राजा’च्या मंडळाला ४ लाख ८६ हजार रुपये दंड केला आहे. लालबागमधील गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने २०७ खड्डे बुजविले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पालिकेने या मंडळाला ४ लाख १४ हजार रुपये दंड ठोठवला आहे. या दोन्ही मंडळांवर पालिकेने दंडात्मक कारवाईबाबतची नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर योग्य पद्धतीने खड्डे न बुजविणाऱ्या लालबाग आणि परळ परिसरातील अन्य १८ मंडळांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून या मंडळांवरही पालिकेने नोटीस बजावली आहे.

दंडाची थकबाकी ३० लाखांवर

गणेशोत्सव साजरा करताना मंडप आणि अन्य व्यवस्थेसाठी रस्ता व पदपथावर खड्डे खोदल्याप्रकरणी यापूर्वीही ‘लालबागच्या राजा’च्या मंडळावर पालिकेने दंड ठोठावला होता. मात्र मंडळाने दंडाची रक्कम अद्याप भरलेली नाही. त्यामुळे थकबाकीसह दंडाची रक्कम तब्बल ३० लाख रुपयांच्या घरात पोहोचली आहे.