गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिलेल्या निर्देशांचे पालन राज्यभरात करण्यात यावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. गणेशोत्सव काळात ध्वनिवर्धकाचा वापर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या र्निबधानुसारच करण्यात यावा, असे स्पष्ट करुन याकाळात चार दिवस ध्वनिवर्धकाचा वापर रात्री बारापर्यंत करण्यास परवानगी देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
आगामी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठकीचे आयोजन सह्य़ाद्री अतिथीगृहात केले होते. त्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. ध्वनिवर्धकाचा वापर रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत करण्यास न्यायालयाने घेतलेल्या बंदीचे काटेकोरपणे पालन व्हावे. पण केंद्र सरकारने वर्षांतील १५ दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची मुभा दिली असून त्यापैकी चार दिवस गणेशोत्सव काळात सूट देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
अनेक वर्षे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना दरवर्षी नवीन परवानगी घेण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये, त्यांना आधीच्या वर्षांनुसारच परवानगी देण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.