कोणाकडे अवघा दीड दिवस तर कोणाकडे पाच-दहा दिवसांसाठी येणाऱ्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असून गणेश मूर्तीपासून ते मखर-फुले, रोषणाईच्या माळांसारखे सजावटीचे साहित्य अशा विविध गोष्टींच्या बाजारपेठेत किमान ५०० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.
मुंबईत सुमारे १ लाख ८० हजार घरांमध्ये गणेशाची पूजा होते. या काळात प्रत्येक घरात, ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे व इच्छेप्रमाणे खर्च होत असला तरी सर्वसाधारणपणे प्रत्येक घरात श्रींची मूर्ती, सजावट, पूजेचे साहित्य, फळे, फुले आणि आगमन-विसर्जनाची तयारी केली जाते. यासोबतच श्रींसाठी सोन्या-चांदीचे दागिने, पूजेसाठी भटजी, सत्यनारायणाची पूजा, विद्युत रोषणाई, मिरवणुकीसाठी बॅण्डबाजा.. अशा अनेक गोष्टींवर खर्च होतो. गणेश मूर्तीचे दर आणि गणरायाच्या पाहुणचारासाठी केला जाणारा खर्च लक्षात घेता प्रत्येक घरात किमान तीन-चार हजार रुपये ते २०-२५ हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. सरासरी दहा हजार रुपये या हिशेबाने घरगुती गणेशोत्सवासाठी तब्बल १८० कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबईत आजमितीला सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. सहकारी गृहनिर्माण सोसायटय़ांमधील सार्वजनिक गणेशोत्सव आणि लालबाग-गिरगाव भागातील बडी मंडळे यांच्या खर्चाचे आकडे यांची तुलनाच करता येणार नाही.
गणेशोत्सव काळात मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सुमारे सात लाख प्रवासी रेल्वे, एसटी, खासगी बस आणि वाहनांनी गावच्या गणेशोत्सवासाठी जातात. यासाठी दीडशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतची तिकिटे आकारली जातात. जाण्या-येण्याचा प्रवास खर्च लक्षात घेता सुमारे ७० कोटी रुपयांची उलाढाल होते.

घरगुती गणेशोत्सव (सरासरी खर्च)
*मूर्ती – दीड ते दोन हजार रुपये
*मखर, सजावट – दीडहजार रुपये
*धूप, अगरबत्ती, तेल – १००० रुपये
*फळे, मिठाई – १००० रुपये
*फुले – ५०० रुपये
*प्रसाद – ५०० रुपये
*भाज्या, किराणा – १०००
*आगमन-विसर्जन – १०००
*किरकोळ खर्च – ५०० रुपये
*एकूण – दहा हजार रुपये
वाहतूक
*रेल्वे वाहतूक – तीन लाख प्रवासी
*एसटी गाडय़ा – दीड लाख प्रवासी
*खाजगी बस – ५० हजार प्रवासी
*४० हजार वाहने – दोन लाख प्रवासी
*एकूण – सात लाख प्रवासी
*प्रत्येक प्रवाशामागे एक हजार रुपये खर्च धरल्यास ७० कोटी रुपयांची उलाढाल

सार्वजनिक गणेशमंडळांच्या खर्चाचा आकडा २००७ मध्ये ७० कोटी रुपयांच्या घरात होता. आता सात वर्षांनी महागाईचा दर पाहता हा खर्च किमान १५० कोटींच्या घरात गेला आहे.
             – नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई
             सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती