लोकलमध्ये स्टंट करताना कळवा खाडीत पडून मृत्यू झालेल्या गणेश इंगोले या तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. लोकल ट्रेनमध्ये केलेले स्टंट या मुलाच्या जिवावर बेतले होते. इतकेच नाही तर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती गणेशच्या मित्रांनी, त्याच्या घरातल्यांपासून आणि पोलिसांपासून लपवून ठेवली होती. मात्र पोलिसांकडे नंतर स्वतःच जाऊन गणेशचा मृत्यू कळवा खाडीत पडून झाल्याची कबुलीही दिली होती. ज्यानंतर पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतले, मग या सगळ्या मित्रांनी गणेशचा मृत्यू ११ जूनला स्टंट करताना कळवा खाडीत पडून झाल्याची कबुली दिली. यानंतर पोलिांनी कळवा खाडीमध्ये या गणेशचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली होती. अखेर शनिवारी गणेश इंगोलेचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रोळीतल्या पार्कसाईटमध्ये राहणाऱ्या गणेश इंगोलेला याआधीही लोकलमधल्या स्टंटसाठी पकडण्यात आले होते. तसेच समज देऊन सोडूनही देण्यात आले होते. १० जूनला गणेश त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर पडला. तो परत आलाच नाही. सुरूवातीला गणेश हरवल्याची तक्रार त्याच्या घरातल्यांनी दिली. मात्र तो स्टंट करताना कळवा खाडीत पडल्याची आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती, गणेशच्याच मित्रांनी पोलीस चौकशी दरम्यान दिली. गणेश नुकताच १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. तो आपल्या मित्रांसोबत लोकलमध्ये विविध स्टंट्स करत असे. १० जूनलाही तो अशीच स्टंटबाजी करत होता. इतकेच नाही, गणेशने स्टंट करताना लोकलच्या बाहेर पूर्णपणे झुकून रुळावर काम करणाऱ्या रेल्वेच्या कामगाराची टोपीही काढली होती.

यापुढचा स्टंट करताना त्याला मधला एक खांब लागला. गणेशच्या हाताला खांब लागल्याने, त्याचा तोल गेला आणि तो कळवा खाडीत पडला. या घटनेनंतर गणेशच्या मित्रांनी पुढच्या स्टेशनला उतरुन कळवा खाडीजवळ येत शोधाशोधही केली. मात्र त्यांना गणेश सापडलाच नाही. तो आम्हाला भेटला, पण नंतर कुठे गेला हे ठाऊक नाही असे सांगत त्यांनी काही दिवस गणेशच्या पालकांना फसवले. तणाव आल्याने गणेशच्या मित्रांनी ही गोष्ट लपवली होती. मात्र पोलिसांनी कसून चौकशी करताच घडलेली घटना सांगितली. १० तारखेला गणेशचा मृत्यू कळवा खाडीत पडून झाला. तर १५ जूनला त्याच्या मित्रांनी या संदर्भातली कबुली केली. अखेर सुमारे आठवड्याभराने स्टंटबाज गणेशचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. लोकलमधली स्टंटबाजी एका तरुणाच्या जीवावर बेतली. इतकेच नाही, गणेशच्याच मित्रांनी त्याचाच मृत्यू पाच दिवस लपवून ठेवला. आता या गणेशचा मृतदेह कळवा खाडीत सापडला आहे. निदान या मृत्यूवरुन तरी लोकलमधले स्टंटबाज धडा घेतील आणि जीवघेण्या कसरती थांबवतील अशी आशा करायला हरकत नाही.