राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फार विचार करून कमी बोलतात आणि कृती जास्त करतात, बोलण्याची भाषा कृतीअंतीच करायला हवी तसेच कमी बोलणाऱ्यांसमोर अडचणीही येत नाहीत, असे सांगत राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांनी रविवारी ठाण्यात स्वपक्षातील काही बोलघेवडय़ा नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच समुद्रामध्ये बेट उभारणीच्या भूमिकेचा पुनरुच्चार करीत त्यांनी दुबई, बँकाक या शहराची उदाहरणेही दिली.
ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने ‘अ‍ॅडव्हान्टेज कोकण परिषद’ आयोजित करण्यात आली असून परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नाईक बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे,  खासदार संजीव नाईक, कार्यक्रमाचे संयोजक संजय यादवराव, वसई-विरारचे महापौर राजीव पाटील, निमंत्रक निरंजन डावखरे आदीसह नागरिक उपस्थित होते.  
तालुक्याचा किंवा देशाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी नियोजन करावे लागते. त्यासाठी नगररचनाकार विभाग महत्वाचा असतो. त्यामुळे हा विभाग शहरी भागापुरताच राहिला नसून ग्रामीण भागातही त्याची गरज भासू लागली आहे, असे नाईक यांनी सांगितले. तसेच पुढील मंत्रिमंडळात उत्पादन शुल्क खाते देऊ नये, त्याऐवजी नियोजन खाते द्यावे, अशी मागणी पक्ष प्रमुखांकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोकणातील वैभवाचा प्रचार केल्यास देश आणि राज्याच्या अर्थिक घडीला चांगलीच मदत होऊ शकेल, असे सांगत राज्य शासनाने पर्यटनाच्या जाहिरात व प्रसाराकरीता सुमारे ५० कोटींची तरतूद केली पाहिजे, त्यापैकी २५ कोटी रुपये कोकणासाठीच खर्च करायला हवे, अशी मागणी आमदार भाई जगताप यांनी केली. तिसरा आणि चौथा ग्लोबल कोकण महोत्सव नेस्को कॉम्प्लेक्स व बीकेसी येथे होणार असून पाचवा महोत्सव लंडनमध्ये होईल, अशी माहितीही त्यांनी  दिली.
कोकणातील पाच जिल्हे म्हणजे पांडव आहेत, त्यामुळे महाभारत जिंकायचे असेल तर पाच पांडव जिंकले पाहिजेत, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष पारकर यांनी सांगितले. तसेच पाच जिल्ह्य़ांच्या विकासासाठी स्वंतत्र कर लावण्याची गरज असल्याचेही मतही त्यांनी व्यक्त केले.
येत्या जानेवारी महिन्यात नेस्को कॉम्प्लेक्स येथे ग्लोबल कोकण महोत्सव होणार असून त्यासाठी शासनाने पाच कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी संयोजकांनी केली आहे. त्याचाच आधार घेत शासनाकडून निधी मिळाला नाहीतर आपण पाच कोटी रुपये महोत्सवासाठी देऊ, असे गणेश नाईक यांनी जाहीर केले. ग्लोबल कोकण परिषदमध्ये रणजितराव खानविलकर यांनी कृषी क्षेत्रातील गुंतवणूकीच्या व विकासाच्या संधी, डॉ. आनंद तेंडूलकर यांनी फळप्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीच्या व विकासाच्या संधी, दिग्दर्शक संदीप सावंत यांनी कला क्षेत्रातील गुंतवणूकीच्या संधी या विषयांवर तसेच एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता शरद ओरसकर यांनी महामुंबई व न्हावा सी लिंक प्रकल्पाची उपस्थितांना चित्रफितीद्वारे माहिती दिली.