मंगळवारी झालेली अतिवृष्टी आणि गणपती यामुळे निकालास विलंब झाल्याचा दावा मुंबई विद्यापीठाने केला. ‘आम्ही लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न करत आहोत’ असे स्पष्टीकरणही विद्यापीठाने दिले.

उत्तरपत्रिकांच्या ऑनलाइन मूल्यांकनाच्या घोळानंतर मुंबई हायकोर्टासमोर रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठी कबूल केलेली तिसरी मुदत पाळण्यातही मुंबई विद्यापीठाला अपयश आले. मुदत संपुष्टात येऊनही विद्यापीठाच्या ४७७ परीक्षांपकी ३३ परीक्षांचे निकाल अद्याप प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर आज (गुरुवारी) मुंबई हायकोर्टात पुन्हा सुनावणी झाली.

मुंबई विद्यापीठाची बाजू मांडणारे वकील रूई रॉड्रीक्स यांनी पाऊस आणि गणेशोत्सवामुळे निकालाला विलंब झाल्याचे सांगितले. मंगळवारी मुंबईत अतिवृष्टी झाली. याचा परिणाम इंटरनेट सेवेवर झाला होता. तसेच गेल्या आठवड्यात गणेश चतुर्थीची सुट्टी होती. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीसाठी प्राध्यापक येऊ शकले नाही असा युक्तिवाद त्यांनी हायकोर्टात केला. तीन वेळा डेडलाईन उलटल्यानंतरही निकाल जाहीर करण्यात अपयश आलेल्या मुंबई विद्यापीठाने यंदा हायकोर्टात सावध भूमिका घेतली. लवकरच निकाल जाहीर करु असे विद्यापीठाने हायकोर्टात सांगितले. याप्रकरणाची पुढील सुनावणी ६ सप्टेंबररोजी होणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या निकाल रखडपट्टीमुळे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागलेल्या विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. निकालाच्या विलंबामुळे शैक्षणिक आणि नोकरीच्या संधीवर पाणी सोडावे लागले. तसेच मानसिक त्रासही झाला. याची नुकसान भरपाई देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी याचिकेत केली आहे.