गुलालाची उधळण, फटाके आणि ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे गुरुवारी आगमन झाले आणि गणेश चतुर्थीनिमित्त शुक्रवारी प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भाविकांच्या उत्साहाला उधाण आले असले तरी या आनंदात वीज भारनियमनाच्या शक्यतेने आणि कोकण रेल्वेने घातलेल्या गोंधळाने विघ्न आणले आहे. कोकण रेल्वे मार्गावर रविवारपासून सुरू असलेली वाताहत गुरुवारीही कायम राहिल्याने हजारो चाकरमान्यांचा गावच्या गणपती पूजेचा मुहूर्त चुकण्याची भीती आहे. त्यात भर म्हणून खासगी कंपन्यांनी वीज पुरवठय़ात ऐनवेळी कपात केल्याने ऐन गणेशोत्सवात पाच ते सहा तासांचे भारनियमनही राज्यात लागू होण्याची भीती आहे. यावर कळसाध्याय म्हणजे गिरगाव आणि जुहू किनाऱ्यालगत स्टिंग रे माशांचा संचार आढळल्याने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर दहशत पसरली आहे. तेव्हा विघ्नहर्त्यांला ही विघ्ने दूर करण्याचे साकडे नमनालाच घालण्याची वेळ भाविकांवर ओढवली आहे.
मराठवाडय़ात पावसाअभावी वीज निर्मितीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसतानाच खासगी वीज कंपन्यांनी पुरवठा कमी केल्याने राज्यात ३३०० मेगाव्ॉट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. वीज टंचाई वाढल्यास मुंबई वगळता अन्य मोठय़ा शहरांमध्येही चार ते सहा तास भारनियमन करावे लागेल, अशी माहिती गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
कोकण रेल्वेवरील मांडवी, कोकणकन्या या दोन महत्त्वाच्या गाडय़ांच्या वेळा बदलल्याने चाकरमान्यांचा घरच्या गणपतीच्या पूजेचा मुहूर्त अखेर हुकलाच. दादर-रत्नागिरी पॅसेंजरची बारमाही रडकथा गणेशोत्सवातही कायम आहे. गेल्या वर्षी विसर्जनासाठी समुद्रात उतरलेल्या १२७ जणांना स्टिंग रेने दंश केला होता. यंदाही गिरगाव आणि जुहू किनाऱ्यालगत स्टिंग रेचा संचार आढळल्याने विसर्जनस्थळी डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका सज्ज राहणार आहेत.