बनावट नावाने बँक खाती उघडून त्यावरुन अनेकांना कोटय़वधी रुपयांना गंडा घालणाऱ्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाने गुरुवारी अटक केली. या टोळीने प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिच्या पतीच्या खात्यातूनही बनावट खात्यात साडेबारा लाख रुपये वळवले होते.
अभिनेत्री रविना टंडनचा पती अनिल थडानी याच्या मालकीची ए. ए. फिल्मस् ही कंपनी आहे. या कंपनीतून ३१ जुलै रोजी साडेबारा लाख रुपये नालासोपाऱ्यातील एका बँक खात्यात वळवण्यात आले होते. हे खाते सुमेध गुप्ता या बनावट नावावर उघडण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला होता.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मुज्जमिल तजदार याला पोलिसांनी अटक केली आणि या प्रकरणातील एक एक पैलू उलगडत गेला. या प्रकरणात पोलिसांनी मुज्जमिलबरोबरच सलीम सय्यद, शबाब खान आणि किशोर कनोजिया यांनाही अटक केली असून अन्य तीन आरोपी फरार आहेत. त्यात ऑनलाइन हॅकिंग करणाऱ्या नायजेरियातील नागरिकाचा समावेश आहे. या टोळीने अशा पद्धतीने ठाणे, नाशिक आणि नवी मुंबई येथील कंपन्यांच्या खात्यातून कोटय़ावधी रुपये लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.