गुणपत्रिका दाखवा आणि कर्ज मिळवा अशी जाहिरात करून अनेकांना लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या एका टोळीतील दोघांना ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा या कंपनीच्या नावाचा गैरवापर करत आरोपींना ही फसवणूक केली होती. हरयाणातील या टोळीने ‘गुणपत्रिका दाखवा आणि तात्काळ कर्ज मिळवा’ अशा आशयाची जाहिरात वर्तमानपत्रात दिली होती. त्यानुसार कुमकुम पांडे यांनी जाहिरातीत दिलेल्या संबंधित क्रमांकावर संपर्क केला होता. पांडे यांना १५ लाखांचे कर्ज हवे होते. या आरोपीने पांडे यांना प्रोसेसिंग फी म्हणून १८ हजार रुपये तसेच कमिशन म्हणून ४५ हजार रुपये एका खात्यात भरण्यास सांगितले होते. त्यांनतर कर्जाची रक्कम महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीतून मिळेल असे सांगण्यात आले. कंपनीत गेल्यावर अशी कंपनीने कुठलीच जाहिरात दिली नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे पांडे यांना समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तपास करून सतपाल रामचंदर आणि दयाल नागल यांना हरयाणातून अटक आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरसिह राजपूत यांनी सांगितले.