एका महिलेला ब्लॅकमेल करत पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना माटुंगा येथे उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे तब्बल ११ वर्षांनंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी पाच पैकी तीन आरोपींना अटक केली. दोन आरोपी परदेशी फरार झाले आहेत.
मांटुगा येथे राहणारी एक ३५ वर्षीय महिला आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होती. त्यावेळी तिची ओळख शब्बीर शेख (३७) याच्याशी झाली. शब्बीरने तिला एकदा फसवून गेस्ट हाऊसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी तक्रार केल्यास बदनामी होईल, या भितीपोटी ती गप्प बसली. मात्र शब्बीरचा एक टॅक्सीचालक असेलला मित्र सुरेंद्र पिल्ले याला हा प्रकार समजला. याबाबत तुझ्या पतीला सांगेन, अशी धमकी देत तोही तिला ब्लॅकमेल करत बलात्कार करत राहिला. त्यानंतर हे चक्र सुरू राहिले. पिल्ले याने त्याचा मित्र राजेश तेवर याला सांगितले. त्यानेही त्याच पद्धतीने ब्लॅकमेल करत बलात्कार केला. त्यानंतर कासम आणि रफिक या त्यांच्या मित्रांनीही धमकावत या महिलेवर बलात्कार केला. अशा प्रकारे पाच जण वेळोवेळी या महिलेवर बलात्कार करत राहिले.
या महिलेचा पती परदेशातून आल्यावर तिने अखेर पतीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
केली.
११ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार १७ एप्रिल रोजी दाखल झाली. पोलिसांनी याप्रकरणी शब्बीर शेख, सुरेंद्र पिल्ले आणि राजेश तेवर या तिघांना अटक केली असून उर्वरित दोन आरोपी फरार झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र ठाकूर यांनी दिली.