बारा हजारापैकी केवळ ३५७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी; परवानगी नाकारण्यापेक्षा पालिका व पोलिसांचा अर्ज प्रलंबित ठेवण्यावर भर

गणेशोत्सव मंडळांकडून भर रस्त्यात मंडप उभारणी, ध्वनीवर्धकांचा वापर, सार्वजनिक जागेवर अतिक्रमण अशा गोष्टींमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी कठोर परवानगी प्रक्रिया आणि दंडआकारणी करण्याच्या वल्गना करणाऱ्या राज्य सरकार, पालिका आणि पोलीस प्रशासनांनी प्रत्यक्षात मात्र दिरंगाईच्या मार्गाने मंडळांची सोय करून देण्याची भूमिका घेतली आहे. चुकीच्या मार्गाने साजऱ्या केल्या जाणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना परवानगी नाकारण्यापेक्षा त्यांचे अर्ज प्रलंबित ठेवून त्यांना हवे ते करू देण्याच्या या धोरणामुळे मंडळांचे फावले आहे. त्यामुळे मुंबईत दरवर्षी १२ हजार ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत असताना पालिकेकडे प्रत्यक्षात २०६५ अर्जच परवानगीसाठी आले आहेत. विशेष म्हणजे, त्यातीलही अवघ्या ३५७ अर्जाना पालिकेन परवानगी दिली असून ३५६ अर्ज फेटाळले आहेत.

मुंबई परिसरात दरवर्षी साधारण ११ ते १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होतात. गेल्या वर्षी ११ हजार ५५६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्ती आणल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात पालिकेकडे यातील दोन ते अडीच हजार मंडळेच परवानगीसाठी येतात. सुरक्षा, वीज, प्राथमिक सुविधा पाहून पूर्वी पालिका या मंडळांना परवानगी देत असे. मात्र गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने पादचारी व वाहतुकीला अडथळा येत असलेल्या मंडळांना परवानगी नाकारण्याचा आदेश दिला आणि पालिकेला सरसकट परवानगी देण्यात अडथळे आले. वाहतूक व स्थानिक पोलिसांनी परवानगी दिल्यावरच पालिकेच्या वॉर्ड अधिकाऱ्याला परवानगी देता येत असल्याने यावर्षी अर्ज केलेल्यांपैकी अवघ्या बारा टक्के मंडळांनाच परवानगी देण्यात आली आहे.

सहा महिन्यांवर आलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता कोणताही राजकीय पक्ष धार्मिक भावना दुखावण्यासाठी तयार नाही. त्यातच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे हा राजकीय विचार पोहोचवण्याचा मार्ग असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी गणेशोत्सवातील मंडळांच्या उपद्रवाकडे सोयीने दुर्लक्ष केले आहे. सर्वच पक्षांचे नेते गणेशोत्सव मंडळात पदाधिकारी असतात. त्यामुळे ही मंडळे पालिकेची परवानगी घेण्यासही फिरकत नाहीत. तर परवानगीसाठी आलेल्या मंडळांपैकी बहुतांश मंडळे रस्त्यावर असल्याने त्यांना नियमानुसार परवानगी देता येत नाही. अशा वेळी परवान्याचा मुद्दा गणेशोत्सवाच्या आड येऊ नये म्हणून, या मंडळांचे अर्ज प्रलंबित ठेवून चालढकल करण्याचे पालिका व पोलिसांनी ठरवले आहे. आतापर्यंत आलेल्या २०६५ मंडळांपैकी पोलिसांकडे ११३७ अर्ज प्रलंबित असून पालिकेकडे २१५ अर्ज प्रलंबित आहेत.

अनेक गणेशमंडळांनी पहिल्यांदाच अर्ज दाखल केला आहे. त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्याचप्रमाणे रस्त्यांवर अतिक्रमण करून वसवण्यात आलेल्या वस्त्यांवर कारवाई करण्यात आल्याने येथील ५५ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती के पश्चिम विभाग अधिकारी पराग मसूरकर यांनी दिली. तर एच पश्च्चिम विभागाने ३० मंडळांना परवानगी नाकारल्याचे या विभागाचे अधिकारी शरद उघडे यांनी सांगितले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा परवानगी अहवाल

  • अर्ज केलेली मंडळे – २०६५
  • परवानगी दिलेली मंडळे – ३५७
  • परवानगी नाकारलेली मंडळे – ३५६
  • पोलिसांकडील प्रलंबित अर्ज – ११३७
  • पालिकेकडील प्रलंबित अर्ज – २१५
  • एकूण प्रलंबित अर्ज – १३५२