मुंबई महापालिकेतील नऊ हजार कोटी रुपये खर्चाच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.
 मुंबईतील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने २००८-०९ मध्ये निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात कांजूरमार्ग, देवनार आणि मुलुंड अशा तीन ठिकाणच्या डम्पिंग ग्राऊंडवरील एकंदर सात हजार मेट्रिक टन घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार होती. त्यापैकी कांजूरमार्ग येथील काम ४०८७ कोटी, तर देवनारचे काम ४४०८ कोटी रुपयांना अ‍ॅन्थोनी आणि युनायटेड फॉस्फरस या कंपन्यांना देण्यात आले होते. या कामातील गैरप्रकाराची जागतिक बँकेचे प्रकल्प सल्लागार अजय सक्सेना यांच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यात मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर कुमार गोयल आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांची एसआयटी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.