देशातील पहिलाच प्रकल्प

कांजूरमार्ग येथील पालिकेच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये बायोरिअ‍ॅक्टर तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत असून त्यातून वायूनिर्मितीस सुरुवात झाली आहे. हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरला असून या प्रकल्पामुळे आसपासच्या परिसरातील वायू आणि भूजल प्रदूषण टळू शकेल, असा विश्वास पालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये दररोज ९,५०० मे. टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी तीन हजार मे. टन कचरा कांजूरमार्ग येथील कचरा प्रक्रिया केंद्रामध्ये वाहून नेण्यात येतो. तेथे बायोरिअ‍ॅक्टर तंत्रज्ञानाच्या आधारे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. ६ मार्च २०१५ रोजी सुरू झालेला हा प्रकल्प यशस्वीरीत्या कार्यान्वित झाला असून आता वायूनिर्मितीही होऊ लागली आहे. या प्रकल्पामुळे परिसरात पसरणाऱ्या दरुगधीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. तसेच भूजल प्रदूषण टळण्यासही मदत होणार आहे. या प्रकल्पाबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी पालिकेने ‘निरी’ या संस्थेची नेमणूक केली आहे. तसेच प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींसाठी आयआयटीची मदत घेतली जाणार आहे. या प्रकल्पात सात बायोरिअ‍ॅक्टर सेल उभारण्यात येणार असून पहिला बायोरिअ‍ॅक्टर सेल कार्यान्वित झाला आहे. दुसऱ्या बायोरिअ‍ॅक्टर सेलच्या निर्मितीचे काम प्राथमिक टप्प्यात आहे. पहिल्या बायोरिअ‍ॅक्टर सेलची क्षमता सुमारे १२ लाख मे. टन कचरा सामावून घेण्याची आहे. प्रतिदिन तीन हजार मे. टन कचरा यानुसार ४०० दिवसांमध्ये हा सेल पूर्ण भरेल अशी अपेक्षा आहे.