मुंबई ते मांडवा हा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. सध्या एका तासात होणारा हा प्रवास येत्या काळात अवघ्या २० मिनिटांत पार पडणार आहे. यासाठी या मार्गावर जलद बोटी चालविल्या जाणार आहेत. तसेच गेट वे ऑफ इंडियापासून पाच किमी अंतरावर विशेष जेट्टी उभारण्यात येणार आहे. या जेट्टीवरून मांडवासाठी जाणाऱ्या जलद बोटी सुटणार आहेत.

या सेवेमुळे सध्या गेट वे ऑफ इंडिया येथे जलवाहतुकीसाठी होणारी गर्दी कमी होणार आहे. तसेच मार्गावरील प्रवासी संख्या वाढण्यासही मदत होणार असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. सध्या हा प्रवास कॅटेमरानने केला जातो.

या प्रवासासाठी तब्बल एक तासाचा अवधी लागतो. नवीन जलदगती बोटींमुळे हा प्रवास अवघ्या २० मिनिटांत पूर्ण होऊ शकणार आहे. या बोटींची वेगमर्यादा ताशी ३७ किमी इतकी असणार आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या जेट्टीपासून मांडवा येथील अंतर ९ समुद्री मैल (अंदाजे १७ किमी) इतके आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी सध्या सहा कंपन्यांनी तयारी दर्शविली असून सुरक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत ही सेवा कार्यरत होऊ शकेल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या कंपन्यांच्या बोटीमध्ये १० ते ३० प्रवासी नेण्याची क्षमता असणार आहे. तसेच ग्राहक या बोटीतील आसनाचे आरक्षण प्रीमियम दराने ऑनलाइनही करू शकणार आहेत. सध्या गेटवे ते मांडवा प्रवासासाठी १०० ते १८० रुपये तिकीट आकारले जाते. यामध्ये मांडवा ते अलिबाग बस सेवेचे दरही समाविष्ट असतात. पण या नव्या सेवेसाठी ग्राहकांना मांडवापर्यंतचा प्रवास करण्यासाठी ४०० ते ५०० रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागणार आहे.  दरम्यान, नवीन सेवेसाठी अद्याप अधिकृत दर ठरविण्यात आले नसून मागणी आणि पुरवठय़ावर हे दर ठरले जातील असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. ही सेवा ऑक्टोबर ते जून या कालावधीत सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत उपलब्ध असणार आहे. या नवीन बोटीत सर्व सुरक्षा उपकरणांसह अत्याधुनिक यंत्रणा असणार आहेत. तसेच जीवरक्षक आणि सुरक्षा जॅकेट्सही असणार आहेत.