मोदींच्या छबीची जादू; ‘जनौषधीं’च्या ‘बॅ्रण्डिंग’मुळे मागणी वाढली

केंद्र सरकारने जेनेरिक औषधांच्या वापरासंदर्भात परिपत्रक काढल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असल्या तरी यानिमित्ताने जेनेरिक म्हणजेच ‘जनौषधीं’च्या होणाऱ्या ‘बॅ्रण्डिंग’मुळे या औषधांना कधी नव्हे ती मागणी वाढली आहे. जेनेरिक औषधांची विक्री करणाऱ्या दुकानांबाहेर ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषध केंद्र’ नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी असलेले मोठमोठे फलक झळकू लागले आहेत. परिणामी गेल्या दोन महिन्यांत या दुकानांतील जेनेरिक औषधांचा खप दुप्पटीने वाढला आहे.

जेनेरिक औषधांच्या वापराचा आग्रह खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यानंतर डॉक्टरांनी औषधांच्या बॅ्रण्डऐवजी जेनेरिक नाव लिहून देण्याबाबत केंद्र सरकारने परिपत्रक काढले. त्यामुळे, कधी नव्हे ते जेनेरिक औषधांची चर्चा सुरू झाली असून त्याचा परिणाम या औषधांची विक्री वाढण्यावर झाला आहे.

सध्या मुंबई-उपनगरातील ठाणे, घाटकोपर, बोरिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मालाड, नालासोपारा या भागांत जेनेरिक औषधांची आठ दुकाने आहेत. यातली काही दुकाने गेल्या वर्षभरात सुरू झाली आहेत. परंतु, गेल्या दोन महिन्यांत या दुकानांमध्ये येणाऱ्या ग्राहकाची संख्या वाढली असल्याचे केंद्र चालकांचे म्हणणे आहे. घाटकोपर येथील एलबीएस मार्गावर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जेनेरिक औषधांचे दुकान सुरू झाले. मात्र त्या वेळी ग्राहकांना या औषधांबद्दल विश्वास वाटत नव्हता. ही औषधे स्वस्त असल्याने कितपत परिणामकारक असतील, अशी शंका घेतली जायची. मात्र गेल्या दोन महिन्यांत माध्यमांमध्ये या औषधांची प्रसिद्धी होत असल्याने येथे खरेदी करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे, असे या दुकानातील फार्मासिस्ट मंजिरी तोरसकर यांनी सांगितले. सुरुवातीला येथे येणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसाला १० ते १२ होती. मात्र गेल्या काही दिवसांत ही संख्या वाढून ३० ते ४० वर गेली आहे, असेही तोरसकर यांनी सांगितले.

साधारण ६ ते ७ महिन्यांपूर्वी ठाण्यातील लोकमान्यनगर येथे सुरू झालेल्या जेनेरिक औषधांच्या दुकानाची परिस्थितीही बिकट होती. दिवसाला ३ ते ४ ग्राहक येत असल्यामुळे दुकान चालवणे कठीण झाले होते. अनेकदा तर एकही ग्राहक दुकानात येत नव्हता. हे दुकान झोपडपट्टी भागात असल्याने जेनेरिक औषधांबाबत ग्राहकांमध्ये अज्ञान होते, असे या दुकानातील फार्मासिस्ट भाग्यश्री ढेरे यांनी सांगितले. मात्र पंतप्रधानांच्या नावाचे फलक दुकानाबाहेर लागल्यानंतर मात्र चित्र पालटले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून येणाऱ्या ग्राहकांची संख्या ३० ते ३५ पर्यंत पोहोचली आहे. सुरुवातीला महिन्याला १० हजारांपर्यंत मर्यादित  असलेले उत्पन्न या महिन्यात ४० ते ५० हजारांपर्यंत पोहोचले आहे, असेही त्यांनी नमूद केले. इथल्या बहुतांश औषधांचे उत्पादन इंदूरमध्ये होते. त्यानंतर नागपूरमार्गे ही औषधे राज्यभरात पाठविली जातात, असे मालाडमधील भूषण कुमार या फार्मासिस्टने सांगितले.

कर्करोग व एचआयव्ही आजारांवरील औषधांचा अभाव

सध्या कर्करोगात केमोथेरेपीच्या वेळेस वापरली जाणारी थोडीफार औषधेच जेनेरिक आहेत. त्याशिवाय एचआयव्ही रुग्णांना लागणारी औषधेही जेनेरिकच्या दुकानात उपलब्ध नाहीत.

प्रत्येक औषध हे बॅ्रण्डच्या नावाखाली विकत घ्यायलाच हवे असे नाही. जेनेरिकमध्येही चांगल्या दर्जाची औषधे उपलब्ध असतात. त्यामुळे रुग्णांचे पैसे वाचतात. मात्र रुग्णांनी जेनेरिक औषधे विकत घेताना विश्वासार्हता तपासून घ्यावी.

डॉ. अविनाश सुपे, केईएम रुग्णालय अधिष्ठाता

मी गेली पाच वर्षे मधुमेहाची औषधे घेत आहे. वर्षभरापूर्वी मी जेनेरिक औषधे घेणे सुरू केले. ब्रॅण्डची औषधे विकत घेण्यासाठी मला महिन्याचे ५०० ते ६०० रुपये खर्च करावे लागत होते. पण आता अवघ्या १०० ते १२० रुपयांत मला तीच औषधे जेनेरिकमध्ये उपलब्ध होतात.

महेश कांबळे, मालाड