मुंबईमधील वाहतुकीला गती देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत भू-शास्त्रीय चाचणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून यासाठी पालिका ६.९१ कोटी रुपये खर्च करणार आहे.

नरिमन पॉइंट ते मालाड मार्वेदरम्यान ३५.६० कि.मी. लांबीचा किनारी रस्ता प्रकल्प उभारण्यात येणार आहे. समुद्रकिनारपट्टीलगत काही भागात भराव टाकून रस्ता तयार करण्यात येणार आहे, तर काही ठिकाणी पूल आणि उन्नत मार्ग, बोगदे यांचाही समावेश करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी पालिकेने स्टूप कन्सल्टंट्स आणि ई अ‍ॅण्ड वाय या तांत्रिक सल्लागारांची नेमणूक केली होती. या सल्लागारांनी आपला प्रकल्प अहवाल पालिकेला सादर केला होता. या अहवालाच्या अभ्यासासाठी पालिकेने फिशमन प्रभू या सल्लागाराची नेमणूक केली होती. मात्र स्टूप कन्सल्टंट्सने केलेली भूगर्भ तपासणी आंतरराष्ट्रीय मान्यतेनुसार नसल्याचा निष्कर्ष सल्लागाराने काढला आहे. तसेच अधिक भूगर्भ तपासणीची आवश्यकता असल्याची शिफारस फिशमन प्रभू या सल्लागार कंपनीने केली आहे. त्यानुसार पालिकेने प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत भू-शास्त्रीय चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या.  निविदा प्रक्रियेमध्ये १३.६२ टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविणाऱ्या डीबीएम

जीटेक्निकस् अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन्सला भू-शास्त्रीय चाचणीचे काम देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी या कंपनीला ६.९१ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.