तुमच्या विभागातील उमेदवारांची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपण त्या पक्षाच्या संकेतस्थळावर भेट देतो. पण तेथे आपल्याला त्याची सर्वच माहिती मिळते असे नाही. तुमच्या मतदार संघातील उमेदवारांची माहिती देण्यासाठी आता तुमच्या मदतीला गुगल उभे ठाकले आहे. गुललने मंगळवारपासून google.co.in/elections  नावाची नवी सेवा सुरू केली आहे. यामध्ये तुम्ही तुमचा पीनकोड टाकला की, तुमच्या विभागातील उमेदवारांची माहिती मिळते. या नव्या सुविधेमध्ये आपल्याला आपल्या विभागातील उमेदवारांची प्राथमिक माहिती मिळतेच. याचबरोबर या विभागातील सध्याच्या खासदाराने लोकसभेतील किती सत्रांना उपस्थिती लावली, किती चर्चामध्ये सहभाग दर्शविला, कोणत्या तारखेला कोणता प्रश्न विचारला याची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी गुगलने असोशिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म, पीआरएस अशा काही संस्थांशी माहितीसाठी सामंजस्य करार केला आहे, असे गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंद यांनी स्पष्ट केले.