‘लोकसत्ता फेसबुक लाइव्ह चॅट’मध्ये गिरीश कुबेर यांचे प्रतिपादन

अमेरिकी निवडणुकीचा भारतीय लोकशाहीवर काय परिणाम होईल, नवीन अध्यक्ष पाकिस्तानबाबतची भूमिका बदलतील का, हिलरी क्लिंटन या भारताला किती महत्त्व देतील, अमेरिका-रशिया-भारत अशी साखळी चीनविरोधात उभी राहू शकते का, मध्य पूर्वेकडील देशांच्या तेलविषयक धोरणांमध्ये काय बदल होईल..

विविध प्रश्न, विविध शंका.. अमेरिकी निवडणुकीबाबत भारतीयांच्या मनात किती उत्सुकता आहे, ‘लोकसत्ता’च्या वाचकांची आंतरराष्ट्रीय राजकारणात किती रुची आहे हे दर्शविणाऱ्या. हे दिसून आले लोकसत्ता आयोजित फेसबुक लाइव्ह चॅट या उपक्रमातून. ‘अमेरिका निवडणूक : आपल्यासाठी महत्त्वाची का?’ या विषयावर ‘लोकसत्ता’ने मंगळवारी दुपारी फेसबुकच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्याशी थेट गप्पा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तासाभराच्या काळात जगाच्या कानाकोपऱ्यातून ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजशी जोडलेल्या अनेक वाचकांनी विचारलेल्या प्रश्नांना कुबेर यांनी सविस्तर उत्तरे दिली. अमेरिका हे मुक्त लोकशाही व्यवस्थेचे प्रतीक आहे. त्यामुळे या निवडणुकीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. अमेरिका फक्त अमेरिकनांचीच अशा आपल्याकडील भूमिपुत्र संकल्पनेशी साम्य असणाऱ्या ट्रम्प यांच्या भाषेने अमेरिकेच्या मुक्त लोकशाही व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळेच या निवडणुकीचा निकाल काय लागतो हे पाहणे उत्कंठावर्धक ठरेल, असे मत गिरीश कुबेर यांनी लाइव्ह चॅटचा समारोप करताना व्यक्त केले. तत्पूर्वी त्यांना विचारण्यात आलेल्या बहुतांश प्रश्नांना एक किनार होती ती भारतीय राजकीय परिस्थितीची.

ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार. ते हिंदूंची प्रशंसा करतात. ते निवडून आले तर उजव्या शक्ती प्रबळ होण्यास मदत होईल का किंवा हिलरी निवडून आल्या तर त्यांची व पंतप्रधान मोदी यांची धोरणे जुळतील का, अशा आशयाचे सवाल करतानाच अनेक वाचकांनी भारतीय आणि अमेरिकी व्यवस्थेची तुलना करणारे प्रश्नही विचारले.