महाविद्यालयीन विद्यार्थिनीने तिचा भ्रमणध्वनी दिला नाही म्हणून संतापलेल्या चार तरुणांनी या तरुणीसह तिचे वडील आणि भावावर धारदार शस्त्र, दगडांनी हल्ला चढविला. घटनेनंतर हे तरूण पसार झाले. पोलीस याविषयी धडक कारवाई करीत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोनमध्ये राहणारी दिव्या बठिजा ही चांदीबाई महाविद्यालयात जात होती. हेमराज डेअरी येथे चार तरूण उभे होते. त्यांनी दिव्याचा रस्ता अडवून तिचा भ्रमणध्वनी मागितला. तो देण्यास नकार देताच त्यांनी तिला दमदाटी सुरू केली. या टोळक्याच्या तावडीतून सुटका करून तिने थेट घरी धाव घेतली. हा प्रकार तिने वडील लालचंद बठिजा, भाऊ पियूष यांना सांगितला. हे तिघेही या तरूणांना जाब विचारण्यासाठी हेमराज भागात आले. त्यावेळी या तरूणांनी बठिजा कुटुंबावर हल्ला केला.
या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर जाधव यांनी राकेश मुदलियार याला ताब्यात घेतले असून तिघांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून या गुंडांवर आक्रमक कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिस उपायुक्तांच्या जनता दरबारात भुरटय़ा चोऱ्यांच्या बंदोबस्ताविषयी सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या आहेत.