राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातील धक्कादायक वास्तव
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने राज्याच्या प्रगतीचे गोडवे गायले जात असतानाच कौटुंबिक आरोग्याच्या बाबतीत मात्र राज्य अजूनही मागासलेलेच असल्याचे निदर्शनास आले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही १०० पैकी २५ मुलींचे विवाह वय वर्षे १८ पेक्षा कमी असताना होतात तर महिलांच्या प्रमाणातही घट होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस’च्या सहकार्याने केलेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-१६ या चौथ्या अहवालात ही वस्तुस्थिती अधोरेखित झाली असून महिला आणि लहान मुलांच्या आरोग्यस्थितीत गेल्या दशकभरात फारसा फरक पडला नसल्याचेच चित्र त्यानिमित्ताने समोर आले आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि हिंदू विवाह कायद्यानुसार मुलींचे विवाहयोग्य वय १८ वर्षे आहे. त्यानुसार १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींचा विवाह बालविवाह समजला जातो. मात्र, राज्यातील १८ ते २५ वयोगटातील मुलींपैकी २५ टक्के मुलींचा विवाह वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याच्या आधीच झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. युनिसेफ आणि रंगनाथ मिश्रा आयोगाच्या अहवालातही १८ वर्षांच्या आतील मुलींचे लग्न होण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे नमूद आहे. महिलांच्या संख्येबाबतही आलेख घसरताच असल्याचे स्पष्ट होत आहे. दर एक हजार पुरुषांमागे महिलांची संख्या दहा वर्षांपूर्वी ९७२ एवढी होती. मात्र, त्यात आता घट होऊन हे प्रमाण ९५२ झाले आहे.

खासगी रुग्णालयांत
प्रसूती होण्याचे प्रमाण हे ३३.१ टक्के आहे तर तेच प्रमाण सार्वजनिक रुग्णालयांमध्ये १३.१ टक्के इतके आहे. २००५-०६ यावर्षीच्या सर्वेक्षणात खासगी रुग्णालयात प्रसूती होण्याचे प्रमाण २२.३ टक्के तर सार्वजनिक रुग्णालयात हेच प्रमाण ११.६ टक्के होते.

सर्वेक्षणातील ठळक बाबी
* महाराष्ट्रातील १५ ते ५९ वयाच्या विवाहित महिलांच्या २०१५-१६ वर्षांतील नसबंदीचा आकडा ५०.७ टक्के इतका असून शहरी भागात हे प्रमाण ४४.८ टक्के आणि ग्रामीण भागात ५५.९ टक्के इतके आहे.
* मात्र या तुलनेत पुरुषांची टक्केवारी ही अतिशय कमी असून यावर्षीच्या सर्वेक्षणानुसार एकूण ०.४ टक्के पुरुषांनीच नसबंदी केली.
* त्यातील शहरी भागात ०.२ टक्के आणि ग्रामीण भागात ०.७ टक्के इतके असून २००५-०६ मध्ये हे प्रमाण २.१ टक्के इतके होते.

राज्याचा विकास होत आहे
असे म्हणताना अनेक ग्रामीण भागांमध्ये दारिद्र्य वाढत आहे. बालविवाहाच्या घटनांना अनेक सामाजिक कारणे आहेत. मुलींचे लग्न लावून दिले म्हणजे त्या सुरक्षित झाल्या अशा चुकीच्या समजुतीमुळे शाळेत शिकण्याच्या वयात त्या दोन मुलांच्या आई होतात. हे समाजाच्या विकासासाठी घातक आहे.
– अरुण गद्रे, जनआरोग्य अभियान