महाराष्ट्राचा ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ ठरण्यासाठी सज्ज झालेल्या राज्यातील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांमधून हा किताब मिळविण्याचा बहुमान पटकावला तो पुण्याच्या नेहा देसाई हिने. मानचिन्ह, सन्मानपत्र आणि दहा हजार रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. त्याचबरोबर ती लालित्यपूर्ण वक्तृत्व शैलीसाठी देण्यात येणाऱ्या प्रा. वसंत कुंभोजकर विशेष पुरस्काराचीही मानकरी ठरली. नागपूरच्या शुभांगी ओक हिने दुसरे, तर नाशिकच्या काजल बोरस्ते हिने तिसरे पारितोषिक पटकावले. एकंदर महाराष्ट्राच्या कन्यांनीच या स्पर्धेवर आपली छाप उमटवली. रत्नागिरीच्या आदित्य कुलकर्णीला उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

साडेसात हजार रुपयांचा धनादेश, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे दुसऱ्या, पाच हजार रुपयांचा धनादेश, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे तिसऱ्या, तर उत्तेजनार्थ पारितोषिक तीन हजार रुपयांचा धनादेश, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रा. कुंभोजकर विशेष पुरस्कार विजेत्याला सन्मानचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यातर्फे पुरस्कृत करण्यात आला आहे. ही स्पर्धा विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या पु. ल. देशपांडे सभागृहात शनिवारी  मोठय़ा दिमाखात पार पडली. स्पर्धेला जनकल्याण सहकारी बँक आणि तन्वी हर्बल्स यांचेही मोलाचे साहाय्य लाभले. राज्यातील आठ केंद्रांमधून सवरेत्कृष्ट ठरलेल्या आकांक्षा चिंचोलकर (औरंगाबाद), रिद्धी म्हात्रे (ठाणे), रसिका चिंचोळे (नागपूर), आदित्य कुलकर्णी (रत्नागिरी), श्रेयस मेहंदळे (मुंबई), कविता देवढे (अहमदनगर), शुभांगी ओक (नागपूर), नेहा देसाई (पुणे) आणि काजल बोरस्ते (नाशिक) या नऊ वक्त्यांनी धर्म, लिव्ह इन रिलेशनशिप, ‘आप’चा विजय येथपासून नेमाडे-रश्दी वादापर्यंत विविध विषयांवर आपली मते मांम्डली. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला मुंबईतील प्रेक्षकांचा तुडुंब प्रतिसाद लाभला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेते सचिन खेडेकर हेही आवर्जून उपस्थित होते.