रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा-टॅक्सीविरुद्ध आजपासून कारवाई
मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने पुरेसा वेळ देऊनही इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या ५७५० टॅक्सींचे रिकॅलेब्रेशन अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे अशा टॅक्सींना प्रवासी वाहतूक करण्यावर बंदी घालण्यात आली असून त्यांच्याविरोधात विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
 या  रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा-टॅक्सीविरुद्ध मंगळवारपासून कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशांनीही अशी टॅक्सी आढळल्यास त्याबाबतची तक्रार १८००-२२०-११० या टोल फ्री क्रमांकावर नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील रिक्षा व टॅक्सीच्या प्रवासी भाडेशुल्कात वाढ झाल्यामुळे नवीन दरानुसार इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये आवश्यक बदल (रिकॅलेब्रेशन) करण्याचा आदेश मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने दिला होता. त्यासाठी प्रथम २४ नोव्हेंबपर्यंत मुदत देण्यात आली होती. नंतर संघटनांची मागणी लक्षात घेऊन त्यास मुदतवाढ देत १५ डिसेंबर २०१२ अशी मुदत देण्यात आली. ती मुदत आता संपली असून रिकॅलेब्रेशन न केलेल्या इलेक्ट्रॉनिक मीटरवाल्या टॅक्सींना आता प्रवासी वाहतूक करता येणार नाही. त्यासाठी  विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी चार पथके तयार करण्यात आली असून ही पथके मुंबई शहरभर फिरून अशा टॅक्सींची तपासणी करतील. रिकॅलेब्रेशन न केलेल्या टॅक्सी पकडून त्या नजीकच्या परिवहन कार्यालयात ठेवण्यात येतील.
तसेच रिकॅलेब्रेशन न केलेल्या टॅक्सींना शेअर तत्त्वावर आणि प्री-पेड तत्त्वार प्रवासी वाहतूक करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. अशा टॅक्सींचा परवाना नूतनीकरण, परवाना हस्तांतर, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण अशी सर्व कामे थांबवण्यात आली आहेत. परवाने मुदत समाप्तीनंतर अशा टॅक्सीसाठी किमान ७०० रुपये व मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रुपये असा दंड आकारण्यात येणार आहे.
इलेक्ट्रॉनिक मीटरचे रिकॅलेब्रेशन न केलेल्या टॅक्सीमध्ये प्रवाशांनी प्रवास करू नये. अशी टॅक्सी प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळल्यास १८००-२२०-११० या टोल फ्री क्रमांकावर टॅक्सीच्या क्रमांकाची माहिती देऊन तक्रार करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
आजपासून कारवाई  
रिकॅलिब्रेशन न झालेल्या रिक्षा-टॅक्सींवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाने मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला या कारवाईत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारपासून शहरातील बऱ्याच भागात संयुक्त कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात वाहतूक विभागानेही आपल्याकडे मनुष्यबळ कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.
१६ डिसेंबरपासून रिकॅलिब्रेशन न झालेल्या इ-मीटरवाल्या टॅक्सी-रिक्षांवर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. या कारवाईसाठी परिवहन विभागाकडे अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानेही सहकार्य करावे असे पत्र परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी सहआयुक्त विवेक फणसाळकर यांना पाठविले होते. जप्त केलेली वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने वाहने सोडून द्यावी लागतात. त्यामुळे वाहतूक विभागानेही सहकार्य करावे, असे मोरे यांनी पत्रात म्हटले होते. येत्या मंगळवारपासून शहरातील काही भागामध्ये संयुक्त कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे परिवहन सूत्रांनी सांगितले.