लॅपटॉप चोरी करण्यासाठी एका कंपनीच्या सुरक्षारक्षकाने चक्क गोदामालाच आग लावून तब्बल १ कोटी रुपयांचे लॅपटॉप लंपास केले. विशेष म्हणजे आगीत लॅपटॉपसह इतर साहित्य जळाल्याचा समज होऊन मालकांनी चोरीची तक्रार केली नव्हती. परंतु गुन्हे शाखा १२ च्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून ही आग नसून चोरीचे नियोजनबद्ध षडयंत्र असल्याचे उघड केले. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भिवंडीच्या ओवीळ गावात ‘ग्लोबस कॉम्प्लॅक्स’ या कंपनीचे गोदाम होते. या गोदामातील सुरक्षा रक्षक लाला याने लॅपटॉप चोरण्यासाठी अनोखी शक्कल लढविली. त्याने गोदामातील नामांकित कंपनीचे २८० लॅपटॉप आणि मॉनिटर्स लंपास केले आणि गोदामाला आग लावली. आगीमुळे गोदाम जळून खाक झाल्याचे कंपनीच्या मालकाला वाटले होते. यामुळे लालाचा प्रयत्न यशस्वी झाला. लालाने टेम्पो चालक असलेले संतोष भोसले (३७) आणि मोहम्मद आलम (४०) यांच्या मदतीने हे लॅपटॉप नवी मुंबईच्या रबाळे येथील एका गोदामात लपवून ठेवले होते. तेथून ते विकायचा त्यांचा प्रयत्न होता. भोसले आणि आलम दहिसर येथे लॅपटॉप घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा १२ च्या पथकाला मिळाली. त्यानी सापळा लावून या दोघांना अटक केली आणि उर्वरित लॅपटॉप जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखा १२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी दिली. या आगीत गोदामातील २३ कोटी रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले होते. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून आणखी काही जणांना याप्रकरणी अटक होणार असल्याचे खेतले यांनी सांगितले.