कमी दर आणि अधिक विवाहमुहूर्त असतानाही मागणी घटली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी पाचशे व एक हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सुरुवातीच्या दोन दिवसांत ‘काळय़ा’चे सोने करण्यासाठी उडालेली झुंबड ओसरली आहे. निश्चलनीकरणाच्या निर्णयाला एक महिना लोटल्यानंतरही सराफ बाजारात मंदीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, तोळय़ासाठी सोन्याचा दर खाली येत असताना आणि सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाही खरेदीदारांचा ओघ आटल्याने सराफ व्यावसायिक धास्तावले आहेत.

शुक्रवारी मुंबईच्या सराफा बाजारात सोने तोळ्यासाठी (१० ग्रॅम) २८ हजार रुपयांनजीक येऊन ठेपले आहे, तर राजधानी दिल्लीत सोने २८,५०० रुपयांच्या आसपास आहे. तुलनेत चांदीच्या दरातील वाढ लक्षणीय मानली जात आहे. सोने दराचा सध्याचा स्तर हा गेल्या १० महिन्यांतील किमान पातळीवर आहे.

नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन दिवसांत अनेकांनी आपल्या जवळच्या ५०० व एक हजाराच्या चलनातील रोकड सोनेखरेदी करून संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या दोन दिवसांत सोने अक्षरश: ‘ब्लॅक’ने विकले जात होते. मात्र त्या दोन दिवसांनतर सराफ बाजारातील व्यवहार थंडावले आहेत. सोने खरेदीचा सध्याचा हंगाम असला तरी तुलनेत २० टक्क्यांहूनही कमी व्यवहार होत असल्याचे सांगण्यात येते.

सोने-चांदीच्या दरांवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही परिणाम होत आहे. खनिज तेलाचे पुन्हा उंचावत असलेले दर, अमेरिकी डॉलर या चलनाची भक्कमता यामुळे सोन्याची जागतिक स्तरावरही दरांची चकाकी फिकी पडल्याचे मानले जात आहे.

पाडव्यालाही सोन्याची मागणी वाढण्याबाबतही सराफांना साशंकता आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात एकूणच सराफा व्यवसायाशी संबंधित कर कपातीच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतले गेल्यास पुढील दसरा-दिवाळीपूर्वी या मौल्यवान धातूची मागणी वाढली जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

निश्चलनीकरणामुळे ग्राहक सोने खरेदीकडे पाठ वळवीत आहेत. खरे दरखरेदीसाठी सध्या सोन्याचे कमी दर हे पथ्यावर पडायला हवे. त्यातच यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत लग्नाचे अधिक मुहूर्त आहेत. मात्र एरवीच्या मोसमाच्या तुलनेत यंदा केवळ २० टक्केच सोन्याच्या, दागिन्यांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत.

– इशू दातवानी, संस्थापक, अनमोल इन्हेरेन्टली लक्स.