वॉशिंग मशीनच्या मोटारीच्या आतमध्ये ठेवण्यात आलेली सोन्याची १९ बिस्कीटे मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आली. या प्रकरणी मोहम्मद अस्लम शेख यांना अटक करण्यात आली आहे. शेख यांच्याकडे भारताचा पासपोर्ट असून, त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येते आहे.
सोमवारी सकाळी रियाधमधून आलेल्या विमानातून शेख हे मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यांच्याकडील सामानामध्ये वॉशिंग मशिनसाठी लागणारी एक मोटारही होती. त्यांच्या सामानाची तपासणी केली जात असताना हवाई गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी मोटार उघडून बघितल्यावर त्यामध्ये सोन्याची १९ बिस्कीटे असल्याचे दिसून आले. विभागाने हा ऐवज ताब्यात घेऊन शेख यांना अटक केली. विमानतळातून बाहेर पडल्यावर आपल्याला एक व्यक्ती भेटणार होता. त्याच्याकडे ही बिस्कीटे द्यायची होती, असे शेख यांनी चौकशीत सांगितले. त्या व्यक्तीचे नाव सलमान खान असून, त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या सोन्याचे वजन २२०४ ग्रॅम इतके असून, त्याची किंमत ६०.१५ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही तपास करण्यात येतो आहे.