मराठी साहित्यात कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन अशा विविध साहित्यप्रकारांत मुशाफिरी केलेल्या गोनिदा अर्थात गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त ‘मृण्मयी प्रकाशन’ने त्यांच्या अकरा पुस्तकांना नव्या स्वरूपात वाचकांसमोर आणले आहे. अखंड भ्रमंतीमुळे मिळालेल्या विविधांगी जीवनानुभवांची ओळख आपल्या साहित्यातून मराठी समाजाला करून देणाऱ्या ‘गोनिदां’चे जन्मशताब्दी वर्ष सुरू असून त्यांच्या चाहत्यांसाठी आता गोनिदांच्या पुस्तकांच्या नव्या स्वरूपातील आवृत्ती उपलब्ध होणार आहेत.
जवळपास पन्नास वर्षे सह्य़ाद्रीच्या कडेकपारीतील अनेक गडकिल्ले ते भाक्रानांगल धरण तसेच पुर्णेपासून ते नर्मदेपर्यंतच्या प्रदेशांत कलंदरपणे वावरलेल्या गोनिदांना शिवकाळ व गडकिल्ले यांत जितका रस होता तितकाच संतसाहित्य व संतांच्या जीवनातही होता. विविध ठिकाणच्या भटकंतीमधून आलेले अनुभव व त्यातून केलेले जीवनचिंतन गोनिदांच्या साहित्यात शब्दरूप घेऊन आले आहे. १९४५ पासून लिखाणाला सुरुवात केलेल्या गोनिदांनी ८१ पुस्तके लिहिली आहेत.
याचबरोबर संतसाहित्यावरील पुस्तके व संतांची चरित्रेही त्यांनी लिहिली. त्यातल्या संत ज्ञानेश्वरांवरील ‘मोगरा फुलला’, समर्थावर लिहिलेली ‘दास डोंगरी राहतो’ व ‘आनंदवन भुवनी’, संत तुकाराम यांच्यावरील ‘तुका आकाशाएवढा’ ही चरित्रे तसेच ‘मृण्मयी’ व ‘माचीवरला बुधा’ या कादंबऱ्या मृण्मयी प्रकाशनने अलीकडेच वाचकांसमोर नव्या स्वरूपात आणल्या आहेत. आता प्रादेशिक कादंबरीमध्ये स्वत:चा ठसा उमटवलेल्या व कोकणच्या नयनरम्य निसर्गाचे वर्णन करणाऱ्या ‘शितू’ व ‘पडघवली’ या कादंबऱ्या व ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’, ‘किल्ले’, ‘श्रीगाडगेमहाराज’ या पाच पुस्तकांच्याही नव्या आवृत्तींचे प्रकाशन पुणे येथील एस.एम. जोशी सभागृहात ११ जानेवारीला होत आहे. तसेच या वेळी डॉ. वीणा देव यांनी लिहिलेले गोनिदांचे ललित व्यक्तीचित्र ‘आशक मस्त फकीर’च्या नव्या आवृत्तीचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.
नव्या आवृत्तींमध्ये या सर्व अकरा पुस्तकांची मुखपृष्ठे बदलण्यात आली असून ती ख्यातनाम चित्रकार रविमुकुल यांनी रेखाटली आहेत. या पुस्तकांच्या रचना व मांडणीमध्येही कलात्मकता जपण्याचा प्रयत्न केला असल्याचे गोनिदांच्या कन्या व मृण्मयी प्रकाशनच्या प्रकाशक डॉ. वीणा देव यांनी सांगितले.
नवा अनुभव
गोनिदांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे करणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. या कादंबऱ्यांमधील तो काळ, त्यातील माणसे ही अतिशय जिवंत व रसरसलेली आहेत. गोनिदांची अखंड भटकंती हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असून तोच मला अधिक भावला असल्याचे या नव्या आवृत्तीची मुखपृष्ठे रेखाटलेल्या चित्रकार रविमुकुल यांनी सांगितले.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
documentry article lokrang marathi news, lokrang article marathi
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : वन्यजीवांवरील रोमांचक प्रकल्प