साडेचार कोटी रुपये खर्चून १२ इंचांची नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय

मुंबई शहरापासून हाकेच्या अंतरावर असूनही गेली अनेक वर्षे पाण्यापासून वंचित असलेल्या बोरिवलीच्या गोराई गावातील तब्बल ८ हजार गोराईवासीयांना अखेर हक्काचे पाणी मिळणार आहे. ईस्टरच्या तोंडावरच पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने येथील रहिवाशी आनंदात आहेत.

बोरिवली पश्चिमेला गोराई खाडी ओलांडल्यानंतर गोराई गाव लागते. याच गावात एस्सेल वर्ल्डसारखी मनोरंजन पार्क आणि वॉटर किंगडमसारखी वॉटर पार्कदेखील आहेत. या ठिकाणी दररोज पाण्याची उधळण होत असताना गोराईकर मात्र पिण्याच्या पाण्यापासून वंचित होते. मालाड मनोरीमार्गे आलेल्या अवघ्या सहा इंचांच्या जलवाहिनीद्वारे येणाऱ्या तुटपुंज्या पाण्यावरच गोराईकरांची भिस्त होती. हे पाणी येथील लॉज आणि हॉटेलमालकच पळवीत असल्याने रहिवाशांना रोजच पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. मात्र आता फक्त गोराईकरांकरिता तब्बल साडेचार कोटी रुपये खर्चून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम पालिकेतर्फे सुरू करण्यात आले आहे. ही नवीन जलवाहिनी तब्बल १२ इंचांची असणार आहे.

येत्या दहा दिवसांत या जलवाहिनीचे काम पूर्णत्वास येणार असून गोराईवासीयांच्या पाण्याची ददात कायमची मिटणार आहे.

पालिकेकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याने येथील रहिवाशांची बहुतांश भिस्त गावातील विहिरी आणि तलावांद्वारे मिळणाऱ्या पाण्यावर होती. पिण्याकरिता विहिरीचे तर कपडे-भांडय़ांकरिता तलावाच्या पाण्याचा वापर केला जाई. उन्हाळ्यात तळी आटल्यानंतर तर अवस्था फारच वाईट होई. त्यामुळे इथे पाण्याची वाहिनी स्वतंत्रपणे टाकली जावी यासाठी गोराईकर महापालिका कार्यालयांच्या खेपा मारत होते. येथील माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांनीही हा प्रश्न लावून धरला होता. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून पालिकेने साडेचार कोटी खर्चून जलवाहिनी टाकण्याचे ठरविले आहे.

सध्याची मार्वे ते मनोरी ही जलवाहिनी खाडीमार्गे जाते. कुळवेममार्गे ती गोराई गावात जाते. परंतु ती अवघी सहा इंचांची असल्याने गोराईकरांना पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. अपुऱ्या पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नावर पालिकेने पाणी टँकर्सचा तोडगा काढला होता, मात्र त्यामुळे अवघे पाच हजार लिटर पाणीच गोराईकरांची तहान भागवीत होते.

दहा दिवसांत काम पूर्ण

या जलवाहिनीमुळे येथील भंडारवाडा, चर्च पाखाडी, जुईपाडा, अपर आणि लोअर कोळीवाडा आदी भागांबरोबरच आदिवासी पाडय़ांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. आता नव्या जलवाहिनीमुळे फायदा होणार आहे. येत्या १० दिवसांत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होईल. ईस्टरच्या तोंडावरच रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने येथील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया शिवा शेट्टी यांनी व्यक्त केली.