महानगरपालिकेकडून प्रस्तावित असलेल्या मालमत्ता कराच्या नव्या आकारणीमुळे लहान घरांवर पडणारा वाढीव बोजा कमी करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळात याबाबत निर्णय घेऊन आवश्यकता भासल्यास अधिसूचना काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याने ५०० चौरस फुटांपर्यंत घर असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळू शकेल.

नव्या मालमत्ता धोरणास महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक विरोध करत आहेत. त्याच वेळी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी आमदार व नगरसेवक यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राज्याची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. भांडवली मूल्यावर आधारित नव्या करप्रणाली अमलात आणल्यास शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांच्या मालमत्ता करात ४० टक्के वाढ होईल. मुंबईतील आठ लाख घरे ही ५०० फुटांपेक्षा कमी आहेत. हा अतिरिक्त कराचा बोजा पडू नये यासाठी महापालिका अधिनियम १४०अ मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. यासंबंधी उपरोक्त आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत महापालिकेने मुंबईकरांकडून १२०० कोटी रुपये अतिरिक्त कर जमा केला आहे. त्या पाश्र्वभूमीवर मध्यमवर्गीयांना करसवलत देण्याची मागणी भाजपकडून लावून धरली जात आहे.