राज्यातील ५० पेक्षा जास्त नाक्यांवर छोटय़ा वाहनांना टोलमुक्ती देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून (१ जून) केली जाणार असून, ठेकेदार न्यायालयात जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनानेही कायदेशीर लढय़ाची तयारी केली आहे. अवजड वाहनांकडून टोल वसुलीकरिता मुदत वाढवून देण्याची ठेकेदारांची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे.  
येत्या ३१ तारखेला मध्यरात्रीपासून शासनाकडून अधिसूचित केले जाईल त्या टोल नाक्यांवरील टोल बंद केला जाईल. शासनाने सारी तयारी केली असून, शनिवारी अधिसूचना काढण्यात येणार आहे.
राज्यातील १२ टोल नाके कायमचे बंद होणार असून, ५४ नाक्यांवर छोटय़ा वाहनांना टोलमुक्ती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि अतिरिक्त मुख्य सचिव (बांधकाम) आनंद कुलकर्णी यांनी कायदेशीर तज्ज्ञ व वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठकांचा सपाटा लावला आहे. कोणत्याही परिस्थितीत शासनाकडून काही त्रुटी राहता कामा नयेत या दृष्टीने सारे प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ठेकेदारांना टोलमुक्तीच्या बदल्यात रोख रक्कम दिली जाणार आहे. या संदर्भात लेखी पत्र ठेकेदारांना दिले जाणार आहे. टोल सुरू करताना ठेकेदार मुद्दामच कमी वाहने ये-जा करत असल्याची आकडेवारी सादर करतात. म्हणजेच टोल वसुलीसाठी जादा कालावधी मिळतो. आता मात्र याच आकडेवारीच्या आधारे शासनाने नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतल्याने टोल ठेकेदारांना वेगळीच चिंता आहे.
शासनाच्या टोलमुक्तीच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय टोल ठेकेदारांनी घेतला आहे. काही टोल ठेकेदार एकत्र आले असून त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारीही केली आहे. शासनाकडून दिली जाणारी नुकसानभरपाई मान्य नाही, असा त्यांचा पवित्रा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने गेल्या वर्षी ४० टोल नाके बंद करण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिली होती. हा अनुभव लक्षात घेता कायदेशीर लढाई खेळण्याची शासनाने तयारी केली आहे.

एम एच ०९ वाहनांना कोल्हापूरमध्ये वगळणार
कोल्हापूरमधील वादग्रस्त टोल प्रश्नावर तोडगा काढण्याचा भाग म्हणून शहरातील टोल नाक्यांवर एम एच ०९ या कोल्हापूरमध्ये नोंदणी झालेल्या वाहनांना या सोमवारपासूनच टोलमुक्ती दिली जाईल.